भारतीय क्रिकेट चाहत्यांना यावर्षी टी२० सामने मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहेत. आता याच हंगामातील अजून एका मालिकेची घोषणा बीसीसीआयने केली आहे. आयपीएल २०२२ सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत आणि आयपीएलनंतर भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका अशी मायदेशातील टी२० मालिका (IND vs SA T20 Series) खेळली जाणार आहे. मालिकेतील पाच सामने पाच वेगवेगळ्या स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत.
बीसीसीआयने आधीच जाहीर केले आहे की, आगामी आयपीएल स्पर्धा २६ मार्च ते २९ मेपर्यंत खेळली जाणार आहे. आयपीएल मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर १० दिवसांनी दक्षिण अफ्रिकेविरुद्धची ही मालिका सुरू होईल.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआच्या २ मार्चला झालेल्या बैठकीत दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेविषयी निर्णय घेतले गेले. मालिका ९ ते १९ जून यादरम्यान मायदेशात खेळली जाईल. मालिकेतील सामने कटक, विजाग, दिल्ली, राजकोट आणि चेन्नई याठिकाणी खेळवले जाणार आहेत. यापूर्वी कटक आणि विजाग याठिकाणचे सामने बेंगलोर आणि नागपुरमध्ये आयोजित केले गेले होते. पण बैठकीत यामध्ये बदल केला गेला.
काही दिवसांपूर्वी भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर गेला होता. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाने निराशाजनक प्रदर्शन केले होते. दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ अशा फरकाने पराभूत झाला होता. तसेच एकदिवसीय मालिकेत दक्षिण अफ्रिका संघाने भारताला क्लीन स्वीप दिला होता. अशात आगामी मालिकेतील भारतीय संघाचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताला अनपेक्षितपणे पराभव मिळाला होता, पण मायदेशात खेळताना दक्षिण अफ्रिका संघापेक्षा चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड दौऱ्यात भारताला मर्यादित षटकांचे सहा सामने खेळायचे आहेत, तर एकमात्र कसोटी सामनाही खेळायचा आहे. मागच्या वर्षीच्या भारताने इंग्लंडमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली होती, ज्यातील एक सामना रद्द केला गेला होता. हा सामना आता खेळवला जाणार आहे.