---Advertisement---

शेफाली, राधा हिट; टीम इंडिया चौकारासह सेमीफायनलमध्ये फीट

On: शनिवार, फेब्रुवारी 29, 2020 12:53 PM
---Advertisement---

मेलबर्न। ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 7 व्या टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने आज(29 फेब्रुवारी) त्यांच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात श्रीलंका महिला संघाचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. भारताचा हा या विश्वचषकातील सलग चौथा विजय आहे. आजच्या विजयात सलामीवीर फलंदाजी शेफाली वर्मा आणि गोलंदाज राधा यादवने मोलाचा वाटा उचलला.

या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजीत राहिलेला भारतीय संघ आता 5 मार्चला उपांत्य सामन्यात खेळताना दिसेल. भारताने आजचा सामना जिंकण्याआधीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले होते. पण आता भारताने साखळी फेरीतील चारही सामने जिंकून अ गटातील गुणतालिकेत अव्वल क्रमांक पक्का केला आहे.

आज झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारताला 114 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने 14.4 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून आजही तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या शेफाली वर्माने शानदार खेळी केली. तिने 34 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 47 धावांची खेळी केली.

तिला सुरुवातीला स्म्रीती मंधनाने चांगली साथ दिली होती. मात्र मंधना 17 धावांवर असताना उदेशिका प्रबोधनीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. ती बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली. पण आजही तीला मोठ्या धावा करण्यात अपयश आले. ती 14 चेंडूत 15 धावा करुन बाद झाली.

तिच्या पाठोपाठ शेफालीही धावबाद झाली. अखेर जेमिमाह रोड्रीगेज आणि दीप्ती शर्माने नंतर विकेट्स जाऊ न देता भारताला 116 धावांचा टप्पा गाठून दिला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

श्रीलंकेकडून प्रबोधनी आणि शशीकला श्रीवर्धनेने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी राधा यादवने केलेल्या शानदार गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. राधाने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 23 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. यामध्ये तिने श्रीलंकेची कर्णधार चामरी आटापट्टूची महत्त्वाची विकेट घेतली. अटापट्टूने श्रीलंकेकडून सर्वाधिक 33 धावांची खेळी केली.

तिच्याव्यतिरिक्त श्रीलंकेकडून हर्षिता मादवी(12), शशीकला श्रीवर्धने(13) आणि कविशा दिलहरी(25*) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य श्रीलंकेच्या फलंदाज खास कामगिरी करण्यात अपयशी ठरल्या.

भारताकडून गोलंदाजी करताना राधा बरोबरच राजेश्वरी गायकवाडने 2 विकेट्स घेतल्या. तर दीप्ती शर्मा, शिखा पांडे आणि पूनम यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारताच्या गोलंदाजांच्या या शानदार प्रदर्शनामुळे श्रीलंकेला 20 षटकात 9 बाद 113 धावाच करता आल्या.

https://twitter.com/Maha_Sports/status/1233644820347920385

https://twitter.com/Maha_Sports/status/1233625837427200000

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---