भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांच्या ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीविषयी चर्चा रंगली आहे. डेविड वॉर्नर याच्यासमवेत दुसरा सलामीवीर कोण असेल? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. ऑस्ट्रेलिया संघात जो बर्न्स व विल पुकोवस्की या दोन सलामीवीरांचा समावेश आहे. अनेक दिग्गजांनी वॉर्नरच्या साथीदारांविषयी मते मांडली आहेत. मात्र, आता स्वतः डेविड वॉर्नरने आपल्याला कोणासोबत खेळायला आवडेल, याचे उत्तर दिले आहे.
दमदार कामगिरी करत संघात सामील झाला आहे पुकोवस्की
विक्टोरिया संघाकडून खेळणाऱ्या २२ वर्षीय विल पुकोवस्कीने शेफील्ड शिल्ड स्पर्धेत ४९५ धावा काढून ऑस्ट्रेलिया संघात जागा मिळवली आहे. कसोटी मालिकेपूर्वी पुकोवस्कीला आपली प्रतिभा दाखवण्याची एक संधी मिळेल. तो ६ डिसेंबरपासून भारताविरुद्ध चारदिवसीय सराव सामना खेळेल. दुसरीकडे, बर्न्स देखील या सामन्यात सहभागी होईल. बर्न्स मागील पाच कसोटी डावात एकदाही अर्धशतकाची वेस ओलांडून शकला नाही.
वॉर्नरने दिले उत्तर
बर्न्स व पुकोवस्की यांच्यापैकी तुला कोणासोबत फलंदाजी करायला आवडेल? या प्रश्नावर बोलताना वॉर्नर म्हणाला, “विल एक शानदार फलंदाज आहे. तो काहीवेळा संघाच्या आत-बाहेर झालाय. सध्या त्याचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्याचा संघात समावेश करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते. मात्र, बर्न्सने मागील हंगामात काहीही चुकीचे केलेले नाही. आम्हा दोघांत काही चांगल्या भागीदाऱ्या झाल्या होत्या. तुम्ही तुमच्या सलामीवीरांकडून धावांची अपेक्षा करता आणि आम्ही धावा बनविल्या आहेत. शेवटी, संघ व्यवस्थापन घेईल तो निर्णय मला मान्य असेल.”
वॉर्नर-बर्न्स जोडीने केली आहे प्रभावी कामगिरी
आपल्या विधानातून वॉर्नरने अप्रत्यक्षरीत्या जो बर्न्स पहिल्या कसोटीत दुसरा सलामीवीर असावा असे सुचवले आहे. वॉर्नरने पुढे बोलताना म्हटले, “बर्न्स व माझ्यात योग्य ताळमेळ आहे. आम्ही गेल्या हंगामात संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेली. माझ्या मते, जी गोष्ट योग्यरीत्या सुरु आहे, तिच्याशी छेडछाड करण्यात काही अर्थ नाही.”
वॉर्नर व बर्न्स जोडीने मागील हंगामात ५० च्या सरासरीने धावा बनवल्या होत्या. पाकिस्तान व न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकांत विजय मिळवून देण्यात वॉर्नर-बर्न्स जोडीत मोलाचा वाटा होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आश्चर्यकारक! वॉर्नर कधीच नाही खेळणार बीबीएल? मांडली आपली समस्या
“विराट शिवाय टीम इंडिया म्हणजे स्मिथ, वॉर्नर शिवाय ऑस्ट्रेलिया”
वॉर्नरने घेतलं ‘बिग-बीं’चं रूप, सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना विचारला प्रश्न
क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! एकाच दिवशी ६ संघ खेळणार क्रिकेट, रंगणार ३ आंतरराष्ट्रीय सामने