आजपासून(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टणम येथे संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. तसेच दुसरा सामना बंगळूरु येथे 27 फेब्रुवारीला पार पडेल.
या मालिकेतून भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी20 मध्ये पुनरागमन करणार आहेत. या दोघांनाही न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान विश्रांती देण्यात आली होती.
तसेच या मालिकेत भारतीय खेळाडूंना काही खास विक्रम करण्याची संधी आहे.
या मालिकेत होऊ शकतात हे खास विक्रम-
-शिखर धवनला आज अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली तर हा सामना त्याचा 50 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना असणार आहे. आत्तापर्यंत 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळण्याचा टप्पा एमएस धोनी, रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली आणि युवराज सिंग या पाच भारतीय खेळाडूंनी पार केला आहे.
-रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू होण्यासाठी 2 षटकारांची गरज आहे. त्याचे सध्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 102 षटकार आहेत. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल आणि मार्टीन गप्टील यांच्या नावावर आहे. या दोघांनीही प्रत्येकी 103 षटकार मारले आहेत.
-जसप्रीत बुमराहला आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 विकेट्सचा टप्पा पार करण्यासाठी फक्त 2 विकेट्सची गरज आहे. याआधी भारताकडून हा टप्पा फक्त आर अश्विनला गाठता आला आहे.
-विराटने जर या मालिकेत 12 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 500 धावांचा टप्पा पार करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरेल.
-विराटने जर या मालिकेत 47 धावा केल्या तर तो भारताकडून कर्णधार म्हणून टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या क्रमांकावर येईल. याबरोबरच तो रोहितला मागे टाकेल.
सध्या रोहितने भारताचे 15 टी20 सामन्यात नेतृत्व करताना 39.71 च्या सरासरीने 556 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तर विराटने कर्णधार म्हणून 20 टी20 सामन्यात 34 च्या सरासरीने 3 अर्धशतकांच्या सहाय्याने 510 धावा केल्या आहेत.
– विराटने जर या मालिकेत 106 धावा केल्या तर विराट आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल. तसेच मार्टीन गप्टिल आणि शोएब मलिक यांना मागे टाकेल.
विराटने 65 टी20 सामन्यात 49.25 च्या सरासरीने 2167 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील 2272 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर 2263 धावांसह शोएब मलिक तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच भारताचा रोहित शर्मा 2326 धावांसह अव्वल स्थानी आहे.
– एमएस धोनी आणि विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 षटकार पूर्ण करण्यासाठी दोन षटकारांची गरज आहे. भारताकडून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रोहित शर्मा, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनीच 50 षटकारांचा टप्पा पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–सुपर ओव्हरमध्येही सामना झाला टाय, नक्की कोणता संघ जिंकला, वाचा
–माही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ
–आयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात!