भारतीय संघाने नुकताच आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला आहे. यानंतर आता भारतीय संघ पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. 22 सप्टेंबरपासून मोहाली येथे या मालिकेची सुरुवात होत आहे. अशात भारतीय संघ मालिकेची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया संघही पहिल्या वनडे सामन्यात मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या धुरंधरांशिवाय मैदानात उतरेल.
रविवारी (दि. 17 सप्टेंबर) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले होते. सलामीवीर शुबमन गिल, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या बॅटमधून शतक निघाले होते. तसेच, ईशान किशन यानेही महत्त्वपूर्ण खेळी साकारल्या होत्या. मात्र, सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजा यांच्या फलंदाजीने तितके प्रभावित केले नाही. तसेच, दुखापतीतून बाहेर आलेला श्रेयस अय्यर हादेखील लयीत येण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी विभागाविषयी बोलायचं झालं, तर भारतीय संघ मजबूत दिसत आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे शानदार लयीत आहेत. तसेच, फिरकी विभागात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची जोडी 6 वर्षांनंतर वनडेत एकत्र खेळताना दिसेल. त्यांनी 2017मध्ये अखेरचा वनडे सामना एकत्र खेळला होता.
ऑस्ट्रेलिया संघालाही अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 3-2ने पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. अशात संघ भारताविरुद्ध पुन्हा लयीत येण्याचा प्रयत्न करेल. फलंदाजीत डेविड वॉर्नर, मिचेल मार्श आणि मार्नस लॅब्यूशेन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तसेच, दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या स्टीव्ह स्मिथ याच्या येण्याने संघाला मजबूती मिळाली आहे. गोलंदाजी विभागात संघ थोडा कमकुवत दिसत आहे. मात्र, कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना हलक्यात घेतले जाऊ शकत नाही. तसेच, ऍडम झम्पा हादेखील भारतात खूपच यशस्वी ठरला आहे.
आमने-सामने
दोन्ही संघांमधील आकडेवारीविषयी बोलायचं झालं, तर अद्याप 146 सामने खेळले गेले आहेत. यातील 82 सामन्यात ऑस्ट्रेलियाने, तर 54 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 10 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तसेच, मोहाली येथेही ऑस्ट्रेलियाचे पारडे जड राहिले आहे. त्यांनी आपल्या 7 सामन्यांपैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात या मैदानावर 2019मध्ये अखेरचा वनडे सामना खेळला गेला होता. मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला होता.
खेळपट्टी आणि हवामान
मोहाली येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली राहिली आहे. इथे मागील काही काळात मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाज प्रभाव टाकू शकतात. हवामानाबद्दल बोलायचं झालं, तर येथील हवामान स्वच्छ राहील. तसेच, सायंकाळी दवामुळे आव्हानाचा पाठलाग करणे सोपे ठरू शकते.
कुठे पाहायचा सामना?
भारतीय प्रमाणवेळेनुसार, सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. सामन्याची नाणेफेक 1 वाजता होईल. हा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18वर पाहता येईल. तसेच, या सामन्याची स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ऍपवर होईल.
पहिल्या वनडेसाठी संभावित उभय संघ
भारत
केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा/वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर
ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), ऍलेक्स कॅरे, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, मार्कस स्टॉयनिस, मार्नस लॅब्यूशेन, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, सीन एबॉट, ऍडम झम्पा (india vs australia 1st odi match preview predicted eleven weather and live stream know here)
हेही वाचाच-
आयसीसी वर्ल्डकप ट्रॉफी सर्वसामान्यांना पाहता येणार, पुण्यात भव्य मिरवणूक
सहा वर्षांनंतर एकत्र खेळणार अश्विन आणि जडेजा, ‘अशी’ असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन