विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत आमने-सामने आलेत. यातील विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 2 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यानंतर अनेक विक्रमांचे मनोरे रचले गेले. तसेच, रवी बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड यांच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.
या सामन्यात नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने जोश इंग्लिस (Josh Inglis) याच्या 110 धावांच्या वादळी शतकाच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 208 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या 80 धावांच्या जोरावर भारतीय संघाने 19.5 षटकात 8 विकेट्स गमावत 209 धावा केल्या आणि 2 विकेट्स राखून विजय मिळवला. सूर्याव्यतिरिक्त या सामन्यात इशान किशन यानेही 58 धावांची खेळी केली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या टी20 सामन्यातील 10 विक्रम (India vs Australia 1st T20I Records)
– सूर्यकुमार यादव याला 80 धावांच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा त्याचा टी20 कारकीर्दीतील 13वा सामनावीर पुरस्कार आहे. या क्रिकेट प्रकारात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने रोहित शर्मा (12) यालाही पछाडले. सूर्यापुढे मोहम्मद नबी (14) आणि विराट कोहली (15) आहेत.
– सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारा दुसरा भारतीय बनला आहे. त्याच्यापूर्वी हा विक्रम जसप्रीत बुमराह याने याचवर्षी आयर्लंडविरुद्ध केला होता.
– सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय बनला आहे. त्याच्यापूर्वी हा विक्रम केएल राहुल याच्या नावावर होता. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 2022मध्ये आशिया चषक 2022मध्ये 62 धावांची खेळी केली होती.
– सूर्यकुमारने तिसऱ्या किंवा त्याहून खालच्या स्थानी फलंदाजी करताना षटकारांचे शतक पूर्ण केले आहे. तो असा पराक्रम करणारा जगातील तिसरा आणि भारताचा दुसरा फलंदाज बनला.
– भारतीय संघाने टी20 क्रिकेटमध्ये विक्रमी 5व्यांदा 200 किंवा त्याहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. भारताने याबाबतीत दक्षिण आफ्रिकेला (4) पछाडले आहे. तसेच, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 3 वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
– भारताने या सामन्यात टी20 कारकीर्दीतील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. यापूर्वी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 मध्ये 208 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
– इशान किशन याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक ठोककत एमएस धोनी (MS Dhon) आणि रिषभ पंत यांची बरोबरी केली आहे. आता तिघांच्या नावावर टी20त यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्रत्येकी 2 वेळा 50 हून अधिक धावांची नोंद आहे. तसेच, या यादीत केएल राहुल (3) अव्वलस्थानी आहे.
– विशाखापट्टणम टी20 सामन्यात भारताचे एकूण 3 फलंदाज धावबाद झाले. 2015नंतर ही पहिलीच वेळ होती, जेव्हा भारताच्या एका डावात एवढ्या विकेट या धावबादमुळे पडल्या.
– ऋतुराज गायकवाड ‘डायमंड डक’ (Ruturaj Gaikwad Diamond Duck) पद्धतीने बाद होणारा तिसरा भारतीय बनला आहे. त्याच्यापूर्वी जसप्रीत बुमराह 2016मध्ये आणि अमित मिश्रा 2017मध्ये चेंडू न खेळताच बाद झाले होते.
– भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेत रवी बिश्नोईने दुसरी सर्वात महागडी गोलंदाजी केली. विशाखापट्टणम येथे त्याने 4 षटकात 1 विकेट घेत 54 धावा खर्च केल्या. या लाजीरवाण्या विक्रमात कृणाल पंड्या अव्वलस्थानी आहे. त्याने 4 षटकात एकही विकेट न घेता 55 धावा खर्च केल्या होत्या. (india vs australia 1st t20i these 10 amazing records made in visakhapatnam know here)
हेही वाचा-
भारतीय दिग्गजाने सांगितली Rinku Singhची ‘अनटोल्ड स्टोरी’, वाचा भारताला कुणामुळे सापडला हा ‘कोहिनूर हिरा’
‘तो’ पुन्हा अडचणीत! वर्ल्डकप विजेता भारतीय खेळाडूविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण