ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेल्या भारतीय संघाचा बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारी पासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात येणार आहे. मात्र सध्या सिडनी शहरात नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे या कसोटी सामन्याच्या आयोजनाविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र नुकतेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने याबाबत अधिकृत वक्तव्य केले. “सिडनीत वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाचा परिणाम सामन्यावर होणार नाही. मात्र आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत”, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले.
“आम्ही तज्ञांच्या सतत संपर्कात”
सिडनीत निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले म्हणाले, “आम्ही आमच्या तज्ञांच्या सतत संपर्कात आहोत. संपूर्ण मालिकेदरम्यान खेळाडू जैव सुरक्षित वातावरणातच राहतील, याची देखील आम्ही खबरदारी घेतली आहे. परिस्थितीवर आमचे पूर्ण लक्ष असून चिंतेचे कोणतेही कारण नाही.”
सिडनी कसोटी सामनाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता असल्याचे विचारता ते म्हणाले, “कुठलीही अनिश्चतता आहे, असे मला तरी वाटत नाही. आणि म्हणूनच आम्ही खबरदारीसाठी खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बिग बॅश लीग असू द्या किंवा बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय संघ, सगळेच नियमांचे योग्य रीतीने पालन करत आहेत.”
ब्रेट ली सिडनीत परतला
सिडनीत कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि फॉक्स क्रिकेटचा समालोचक ब्रेट लीने सिडनीतील आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासह प्रसारण विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी देखील घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
४ कसोटी सामन्यांची मालिका
ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेला भारतीय संघ बॉर्डर-गावसकर मालिकेत एकूण ४ कसोटी सामने खेळणार आहे. त्यातील पहिल्या सामन्याला १७ डिसेंबरपासून एडिलेडच्या मैदानावर सुरुवात झाली. हा सामना गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
– AUS vs IND Test Live : दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर; दिवसाखेर भारताला ६२ धावांची आघाडी
– भारतीय क्रिकेटर्सचे सुमार क्षेत्ररक्षण; एक-दोन नव्हे, तब्बल तीनवेळा ऑस्ट्रेलियन फलंदाजाला जीवदान
– दक्षिण आफ्रिका संघावर मोठे संकट; तब्बल १० खेळाडू कोरोनाच्या विळख्यात