भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर मालिकेपूर्वी दोन देशांच्या ‘अ’ संघांमध्ये दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात युवा साई सुदर्शननं शतक झळकावून आपली क्षमता सिद्ध केली. विशेष म्हणजे, साई सुदर्शनचं हे शतक तेव्हा आलं, जेव्हा टीम इंडिया कठीण परिस्थितीत होती.
पहिल्या डावात केवळ 107 धावांवर बाद झालेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियानं 195 धावा करत 88 धावांची आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या डावात भारतानं साई सुदर्शनच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शानदार पुनरागमन केलं. साई सुदर्शननं ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध 192 चेंडूत शतक पूर्ण केलं. या डावात त्यानं एकूण 200 चेंडूंचा सामना केला आणि 9 चौकारांच्या मदतीनं 103 धावांची खेळी केली. साई सुदर्शनचं प्रथम श्रेणीतील हे 7वं शतक आहे. याआधी त्यानं रणजी ट्रॉफी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये आपलं कौशल्य दाखवलं आहे.
साई सुदर्शनच्या या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याला टीम इंडियात स्थान देण्याची मागणी होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. अशा स्थितीत साई सुदर्शननं ऑस्ट्रेलियात शतक झळकावून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी आपला दावा ठोकला आहे. जर साई सुदर्शननं ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत देखील मोठ्या धावा केल्या, तर रोहित शर्मा त्याला ऑस्ट्रेलियातच रोखू शकतो, जेणेकरून गरज पडेल तेव्हा तो संघात दाखल होऊ शकतो.
भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, भारतीय संघ पहिल्या डावात फक्त 107 धावा करू शकला होता. पहिल्या डावात साई सुदर्शननं २१ धावांची खेळी केली होती. तर देवदत्त पडिक्कलनं 36 धावा केल्या. दुसऱ्या डावात हे दोन फलंदाज भारतासाठी उभे राहिले. साई सुदर्शननं शतकी खेळी केली, तर पडिक्कलनं 88 धावा ठोकल्या.
हेही वाचा –
केकेआरच्या रिटेंशन यादीत पहिल्या क्रमांकावर होतं श्रेयसचं नाव, पण…; वेंकी मैसूरने सांगितलं सर्वकाही
लखपतींचे बनले करोडपती…! कोहली किंवा क्लासेन नाही आयपीएल रिटेंशनमध्ये ‘या’ खेळाडूंची चांदी
IND vs NZ Test : विराट आणि रोहितच्या फ्लॉप फलंदाजीमागे ‘हे’ तर कारण नाही ना?