भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या या दौऱ्यात दोन्ही संघातील खेळाडू दुखापतींचा सामना करत आहेत. दोन्ही संघातील असंख्य खेळाडू आत्तापर्यंत सामन्यात किंवा सरावात दुखापतग्रस्त झाले आहेत. याबाबत बोलताना ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी या दुखापातींसाठी आयपीएलला जबाबदार ठरवले.
आयपीएलबद्दल बोलताना ही टी-२० स्पर्धा आपल्याला अतिशय आवडते, असे लँगर म्हणाले. मात्र यावेळी कोरोना विषाणूच्या मध्यातच सुरु झालेल्या या स्पर्धेच्या आयोजनाची वेळ चुकली असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळेच दोन्ही संघांतील खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर दुखापती होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
साल २०२० मध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीत करण्यात आले होते. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात आयोजित करण्यात येत असलेली ही स्पर्धा यावेळी कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान खेळवल्या गेली होती. या स्पर्धेनंतर भारतीय तसेच ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर दुखापती झाल्या होत्या.
याबाबतच आभासी पत्रकार परिषदेत बोलतांना लँगर म्हणाले, “मला स्वतःला आयपीएल सारख्या स्पर्धा अतिशय आवडतात. ज्या पद्धतीने आम्ही आमच्या तरुण वयात काउंटी क्रिकेट खेळत होतो तशाच पद्धतीच्या या स्पर्धा आहेत. काउंटी क्रिकेटमुळे आमचे कौशल्य सुधारत होते तर आयपीएलमुळे मर्यादित षटकांसाठीच्या कौशल्यांचा विकास होत आहे.” मात्र या स्पर्धेची वेळ यावर्षी चुकली असे सांगत ते म्हणाले, “दोन्ही संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या बघता हा आयपीएलचा परिणाम आहे, असे आपण म्हणू शकतो. मला खात्री आहे की या गोष्टीवर गांभीर्याने विचार केला जाईल.”
महत्वाच्या बातम्या:
विराट कोहलीला मुलगी झाल्याचे कळताच रितेश देशमुख यांनी दिली अशी प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : आंध्र प्रदेशवर 6 विकेट्सने मात करत दिल्लीचा सलग दुसरा विजय