टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. सध्या या स्पर्धेतील सराव सामने सुरू आहेत. सोमवारी (१८ ऑक्टोबर) भारतीय संघाचा पहिला सराव सामना इंग्लंड संघाविरुद्ध पार पडला होता. तर बुधवारी (२० ऑक्टोबर) भारतीय संघाचा सराव सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पार पडणार आहे. चला तर जाणून घेऊया या सामन्याबद्दल अधिक माहिती.
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याबद्दल अधिक माहिती
भारतीय विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना बुधवारी (२० ऑक्टोबर) रोजी पार पडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. तसेच हा सामना आयसीसीए ओवल १ च्या मैदानावर पार पडणार आहे.
कुठे पाहू शकाल हा सामना?
तुम्ही हा सराव सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकाल. तसेच जर तुम्हाला हा सामना ऑनलाईन पाहायचा असेल तर, तुम्ही डिस्नी + हॉटस्टारवर देखील पाहू शकता. डिस्नी + हॉटस्टारवर सर्व सराव सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहायला मिळणार आहे.
यातून निवडला जाईल भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
यातून निवडला जाईल ऑस्ट्रेलिया संघ
एश्टन एगर, पॅट कमिंस, आरोन फिंच (कर्णधार), जोश हेजलवुड, जोश इंग्लिश, मिशेल मार्शो, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मिशेल स्वेपसन, मॅथ्यु वेड, डेविड वॉर्नर, एडम झांपा.
पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर मिळवला विजय
इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाला २० षटक अखेर १८८ धावा करण्यात यश आले होते. इंग्लंड संघाकडून जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक ४९ मोईन अलीने ४३ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना ईशान किशनने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ५१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघावर मिळवला होता विजय
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केन विलियमसनने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली होती. तर डेरील मिशेलने ३३ धावांचे योगदान दिले होते.या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ७ बाद १५८ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तर मार्कस स्टोइनिसने २८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने सराव सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
ओमानची निर्णायक क्षणी हाराकिरी; विजयामुळे बांगलादेशच्या सुपर १२ च्या आशा कायम






