भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिला सामना एॅडिलेडच्या मैदानावर १७ डिसेंबरपासून खेळविण्यात येतो आहे. या सामन्यात भारतीय संघाने सलामीच्या जागी सध्या फॉर्मात नसलेल्या पृथ्वी शॉला संधी दिली होती. कर्णधार विराट कोहलीने पृथ्वीमध्ये गुणवत्ता असून तो चांगले प्रदर्शन करेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र पृथ्वी शॉ या सामन्यातील दोन्ही डावात सपशेल अपयशी ठरला आहे. पहिल्या डावात भोपळाही फोडू न शकलेला पृथ्वी दुसर्या डावात अवघ्या ४ धावांवर तंबूत परतला.
दोन्ही डावात सपशेल अपयशी
मुंबईकर पृथ्वी शॉ गेले काही महिने खराब फॉर्मशी झुंजतो आहे. आयपीएलमध्येही चांगली कामगिरी न केल्याने त्याला संघाबाहेर बसावे लागले होते. ऑस्ट्रेलिया दौर्यावर सराव सामन्यातही तो धावा काढू शकला नाही. असे असतानाही त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली. मात्र या संधीचा लाभ घेण्यातही तो अपयशी ठरला आहे.
पहिल्या डावात दुसर्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने पृथ्वीचा त्रिफळा उडवत त्याला बाद केले होते. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅब्यूशानेचा अतिशय सोपा झेलही त्याने सोडला होता. एकूणच हा सामना त्यासाठी एक दुःस्वप्न ठरत असताना दुसर्या डावात तरी पृथ्वी चांगली कामगिरी करेल अशी सगळ्यांना आशा होती. मात्र दुसर्या डावात देखील अवघ्या ४ धावांवर त्रिफळाचीत होऊन तो माघारी परतला. दोन्ही डावात एकाच पद्धतीने बाद झाल्याने त्याच्या तंत्रातील दोष उघडे पडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
यापुढे संधी मिळणे कठीण
खरंतर पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉला त्याच्या खराब फॉर्ममुळे संधी मिळणार नाही, असे भाकीत अनेक आजी-माजी खेळाडूंनी केले होते. तसेच सराव सामन्यात दमदार प्रदर्शन करणारा युवा फलंदाज शुभमन गिल अथवा मर्यादित षटकांच्या सामन्यांत धावांचा पाऊस पाडणारा केएल राहुल यांना सलामीच्या जागी संधी मिळावी, असा मतप्रवाह होता. मात्र संघ व्यवस्थापनाने पृथ्वीवर विश्वास दर्शवत त्याला पहिल्या सामन्यात संधी दिली. परंतु त्याचे हे प्रदर्शन बघता पुढच्या सामन्यांमधे त्याला खेळायला मिळणे कठीण दिसते आहे. भारताकडे इतर दमदार पर्याय उपलब्ध असणे, आणि पृथ्वीच्या तंत्रातील दोष उघडे पडणे, या दोन्ही गोष्टी पृथ्वी शॉला इथून पुढे संधी मिळणे कठीण असेल, हेच दर्शवितात. त्यामुळे कसोटी संघात तो आपले स्थान टिकवू शकतो का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
संबंधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर; दिवसाखेर भारताला ६२ धावांची आघाडी
– कसं व्हायचं याचं! सोप्पा झेल सोडल्यानंतर पृथ्वी शॉ सोशल मिडीयावर होतोय ट्रोल
– रिकी पाँटिंगने पृथ्वी शॉबद्दल केलेली ही भविष्यवाणी ठरली खरी