कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबरला तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात असून ३ वनडे, ३ टी२० व ४ कसोटी सामने खेळणार आहे. परंतू आता वनडे मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाने मालिकेतून माघार घेतली आहे.
केन रिचर्डसनने घेतली माघार
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी (18 नोव्हेंबर) सांगितले की, “ऍडिलेडमध्ये आपली पत्नी आणि नुकताच जन्मलेल्या मुलासमवेत वेळ घालवण्यासाठी रिचर्डसनने मालिकेतून माघार घेतली आहे.” त्याच्या ऐवजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायला भारताविरुद्ध होणाऱ्या वन डे आणि ट्वेंटी -२० मालिकेसाठी संघात स्थान दिले आहे.
त्याचा निर्णय पूर्णपणे मान्य आहे– निवड समिती प्रमुख
ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय संघ निवडकर्ता ट्रेव्हर होन्स म्हणाले की, “रिचर्डसनसाठी हा निर्णय घेणे अवघड होते, परंतु निवडकर्त्यांचा आणि संपूर्ण संघाचा खेळाडूला पाठिंबा असतो. संघाला त्याचे योगदान लाभणार नाही पण त्याचा निर्णय आम्हाला मान्य आहे.”
इंग्लंड दौऱ्यावर संघाचा भाग होता टाय
अँड्रयू टायने 7 वनडे सामने आणि 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने नुकताच इंग्लंड दौरा केला होता. या दौऱ्यावर तो ऑस्ट्रेलिया संघात वेगवान गोलंदाज म्हणून सहभागी झाला होता.
ऑस्ट्रेलियात कोव्हिड-19 चा उद्रेक
दरम्यान, दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्यात कोव्हिड -19 या साथीच्या आजाराच्या उद्रेकामुळे काही देशांतर्गत संघातील खेळाडूंनी न्यू साउथ वेल्स राज्यात उड्डाण केले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना विषाणूचे 20 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी इतर 14 लोकांना या कोरोना विषाणूचा धोका असल्याचे म्हटले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया परिस्थितीवर ठेवेल लक्ष
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी निक यांनी सांगितले की, “भारताविरुद्ध होणारी आगामी मालिका आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा योग्य रीतीने पार पडावी म्हणून गेल्या 24 तासात आम्ही अनेक लोकांची मदद घेतली आहे. सीए दक्षिण ऑस्ट्रेलियामधील परिस्थिती आणि देशभरातील सीमा निर्बंधांवर नजर ठेवेल.”
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांचे वेळापत्रक
पहिला वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वनडे -02 डिसेंबर – कॅनबेरा
प्रथम टी20 – 04 डिसेंबर – कॅनबेरा
दुसरा टी20 – 06 डिसेंबर – सिडनी
टिसरा टी 20 – 08 डिसेंबर – सिडनी
पहिला कसोटी सामना – 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर – अॅडिलेड
दुसरा कसोटी सामना – 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – 07 जानेवारी ते 11 जनावरी – सिडनी
चौथा कसोटी सामना – 15 जानेवारी ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन