श्रीलंका दौरा संपल्यानंतर आता विश्रांतीवर असलेला भारतीय संघ येत्या काही दिवसांत मैदानावर उतरणार आहे. 19 सप्टेंबरपासून भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. दरम्यान आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक मोठी बातमी दिली आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या तीन सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. यातील सर्वात खास भारत-बांगलादेश सामना आहे, जो नवीन स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या स्टेडियममधील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल.
भारत विरुद्ध बांगलादेश संघांमधील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर 3 सामन्यांची टी20 मालिकाही खेळवली जाणार आहे, जी 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सामन्याच्या ठिकाणात मोठा बदल करण्यात आला आहे. आधी हा सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे खेळवला जाणार होता, पण आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे. या शहरात 14 वर्षांतील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल. यापूर्वी 2010 मध्ये या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे सामना झाला होता, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर द्विशतक झळकावणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला होता. पण हा सामना या रूपसिंग स्टेडियममध्ये होणार नाही, तर तो ग्वाल्हेरमध्ये बांधलेल्या नवीन श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या स्टेडियमवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन होणार आहे.
या सामन्यांमध्येही बदल
केवळ हा सामनाच नाही तर याशिवाय इतर दोन सामन्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. पुढील वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यात हे सामने होणार आहेत. इंग्लंडचा संघ जानेवारीत भारत दौऱ्यावर येईल, ज्यामध्ये पहिली 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदल करण्यात आली आहे. पहिला टी20 सामना 22 जानेवारीला चेन्नईत खेळवला जाणार होता पण आता हा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे. 25 जानेवारीला कोलकाता येथे होणारा दुसरा टी20 आता त्याच तारखेला चेन्नईत खेळवला जाईल. बीसीसीआयने याचे कारण दिले की, प्रजासत्ताक दिनाच्या तयारीचा हवाला देत कोलकाता पोलिसांनी या बदलाची मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
विनेशला रौप्य पदकासाठी करावी लागणार प्रतिक्षा, ‘या’ दिवशी होणार निर्णय
दिग्गज क्रिकेटरचा नोकरीसाठी क्रिकेटला रामराम, 30 शतके आणि 16 हजारांहून अधिक धावा आहेत नावावर
“बचावात्मक होण्यापेक्षा अपयशी होणे चांगले”, भारतासाठी 744 विकेट्स घेणाऱ्या अश्विनचे विधान