महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सुरू असलेल्या, भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात, भारतीय संघाने इंग्लंड संघाला ६६ धावांनी धूळ चारली आहे. यासोबतच भारतीय संघाने या मालिकेत १-० ने पुढाकार घेतला आहे. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंचा बोलबाला होता. अष्टपैलू कृणाल पंड्याने आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले, तर दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णाने ४ गडी बाद करून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अशातच अर्धशतक झळकावणाऱ्या कृणाल आणि इंग्लंडचा गोलंदाज टॉम करन यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कृणाल पंड्याला वनडे मालिकेत संधी देण्यात आली आहे. पदार्पण करण्याची संधी मिळताच त्याने संधीचे सोने केले. कारकीर्दीतील पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. पहिल्या डावातील ४९ व्या षटकात वातावरण तापलेले पाहायला मिळाले. कृणालने अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर १ धाव घेतली त्यावेळी गोलंदाजी करत असलेल्या टॉमने काहीतरी म्हटले होते, ज्यावर कृणालने संताप व्यक्त केला.
झाले असे की, कृणाल पंड्या आणि केएल राहुल मैदानात चारही बाजूला फटकेबाजी करत होते. त्यावेळी दोघांनीही आपले अर्धशतक पूर्ण केले होते, तर ४९ व्या षटकात, टॉमने टाकलेल्या चेंडूवर कृणालने एक धाव घेतली आणि धाव पूर्ण करून नॉन- स्ट्रायकर एन्डला जात असताना, टॉमने संतापात येऊन काहीतरी म्हटले जे ऐकून कृणाल पंड्याचा संताप देखील अनावर झाला. या प्रकरणात पंचांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर देखील शाब्दिक युद्ध काही संपत नव्हते. त्यावेळी जोस बटलरने येऊन वातावरण शांत केले.
राहुल- कृणालने केली शतकीय भागीदारी
गेल्या काही सामन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत असलेल्या, केएल राहुलवर विश्वास दाखवत विराट कोहलीने त्याला संघात स्थान दिले. त्या संधीचे सोने करत त्याने अर्धशतकीय खेळी केली आहे. तसेच या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या कृणाल पंड्याने देखील अर्धशतकीय खेळी करत वनडे क्रिकेटमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. या दोघांनीही शेवटच्या षटकांमध्ये इंग्लंड संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तसेच ६ व्या गड्यासाठी दोघांनी १०८ धावा जोडल्या. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटकाअखेर ५ बाद ३१७ धावांचा डोंगर उभारता आला. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाचा डाव २५१ धावांवर सर्वबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-त्यावेळी किरण मोरेंनी पैश्यांना प्राधान्य दिले असते तर आज कृणाल-हार्दिक टीममध्ये दिसले नसते
-मिशेल स्टार्कने केला मोठा खुलासा; ‘या’ कारनामुळे घेतला आयपीएल २०२१ हंगामात न खेळण्याचा निर्णय