अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ५ सामन्यांची टी२० मालिका नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (१२ मार्च) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता दुसरा टी२० सामना रविवारी (१४ मार्च) होणार आहे.
पहिल्या सामन्यात अपयश
भारतीय संघाला पहिल्या सामन्यात ८ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात श्रेयस अय्यर व्यतिरिक्त अन्य भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसले. भारताला श्रेयस अय्यरने केलेल्या ६७ धावांच्या खेळीच्या जोरावर १२४ धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर १२५ धावांचे आव्हान इंग्लंडने १६ षटकांच्या आत २ विकेट्सच्याच मोबदल्यात सहज पार केले होते.
या सामन्यात पराभव स्विकारावा लागल्याने भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यातही भारतीय संघाच्या संघनिवडीवर अधिक टीका झाली. त्यामुळे आता रविवारी होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारताच्या ११ जणांच्या संघात काही बदल झालेले दिसू शकतात.
असा असू शकतो दुसऱ्या टी२० साठी संभावित ११ जणांचा भारतीय संघ
सलामीवीर –
पहिल्या टी२० सामन्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले होते की सलामीवीर रोहित शर्माला पहिस्या २ टी२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि केएल राहुल यांची जोडी सलामीला फलंदाजीसाठी उतरली होती. मात्र, त्या दोघांनाही पहिल्या सामन्यात खास काही करता आले नाही. पण, दुसऱ्या टी२० साठी त्यांच्यावर विश्वास ठेवत संघात कायम ठेवले जाऊ शतके. तसेच रोहितला दुसऱ्या सामन्यासाठीही विश्रांती दिली जाऊ शकते.
मधली फळी
मधल्या फळीत विराट कोहली कर्णधार असल्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कायम असेल. तसेच रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे देखील चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी संघात असतील. विराटला जरी मागील काही सामन्यांमध्ये खास काही करता आले नसले तरी त्याचा अनुभव पाहाता, तो संघात कायम असेल.
तसेच अय्यरने पहिल्या सामन्यात एकाकी झुंज देत केलेल्या अर्धशतकामुळे तो लयीत असल्याचे दाखवून दिले आहे. याबरोबर रिषभला जरी पहिल्या सामन्यात खास काही करता आलं नसलं तरी त्याने मागील काही सामन्यांतून तो लयीत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे तो देखील अंतिम ११ जणांच्या संघात कायम असेल.
अष्टपैलू
दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर कायम राहू शकतात. हार्दिकने पहिल्या सामन्यात मोठी खेळी केली नसली तरी त्याच्याकडे आक्रमक खेळण्याची क्षमता आहे. तसेच तो एखाद्या षटकात गोलंदाजीही करु शकतो. त्यामुुळे तो संघात कायम राहिल. तसेच वॉशिंग्टन सुंदर तळातल्या फलंदाजीला मजबुती देतो. त्याचबरोबर तो फिरकी गोलंदाजी करत असल्याने भारताला संघात समतोल साधण्यास मदत होईल. त्यामुळे तो देखील संघात कायम राहिल.
गोलंदाज
दुसऱ्या टी२० सामन्यासाठी गोलंदाजीत मात्र बदल होऊ शकतो. पहिल्या सामन्यात भारताने सुंदरसह अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल या दोन्ही फिरकीपटूंना खेळवले होते. पण या दोघांनीही फारशी बरी गोलंदाजी केली नाही. त्यामुळे दुसऱ्या टी२० सामन्यासाठी चहल किंवा पटेल यांच्यातील एकाला वगळून दिपक चाहरला संधी दिली जाऊ शकते. दिपकने भारताकडून खेळताना आत्तापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये छाप पाडली आहे. त्यामुळे त्याचा दुसऱ्या टी२० सामन्यासाठी संघातील समावेश जवळपास निश्चित आहे. याचबरोबर त्याला वेगवान गोलंदाजीत साथ देण्यासाठी भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर असतील.
दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारताचा संभावित ११ जणांचा संघ –
शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, दिपक चाहर, अक्षर पटेल/युजवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रोहित नसेल तर मी सामना पाहणार नाही’, सेहवागचे पहिल्या टी२० सामन्यानंतर मोठे वक्तव्य
जालीम नजर हटा ले! ‘त्या’ काकूच्या नजरेने भल्याभल्यांचे वेधले लक्ष, प्रतिक्रियांचा पडला पाऊस
सलग दुसऱ्या वर्षी आशिया चषक आयोजनात अडथळा, पाकिस्तानचा विरोध