भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला येत्या ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावरील सामन्याने या मालिकेला प्रारंभ होईल. या मालिकेसाठी भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्वाच्या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. मात्र त्यामुळे काही खेळाडूंचा अंतिम अकरातील सहभाग अनिश्चित झाला आहे.
शुबमन-रोहितला प्रथम पसंती
यात प्रामुख्याने सलामीवीर मयंक अगरवालचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सलामीवीरांच्या जागी भारतीय संघ रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना संधी देण्याची शक्यता आहे. मयंक अगरवालला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत संघात स्थान मिळाले होते. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात तो अपयशी ठरला होता. तसेच चौथ्या कसोटीतही हनुमा विहारी दुखापतग्रस्त झाल्याने मयंकला पाचव्या क्रमांकावर खेळवण्यात आले होते, परंतु याही सामन्यात त्याला समाधानकारक खेळी करण्यात अपयश आले.
मात्र त्याचवेळी, सलामीच्या स्थानी संधी मिळालेल्या युवा शुबमन गिलने दमदार खेळी करत या स्थानावरील दावेदारी अजूनच भक्कम केली. तसेच दुसरा सलामीवीर म्हणून अनुभवी रोहित शर्माचा पर्याय भारतापुढे आहे. अशावेळी मयंकला पुन्हा एकदा संघात स्थान मिळणे, सध्या तरी कठीण दिसते आहे.
मायदेशातील आकडे मयंकच्या बाजूने
कर्नाटकाचा २९ वर्षीय फलंदाज मयंक अगरवालने आत्तापर्यंत भारताकडून १४ कसोटी सामन्यात जवळपास ४६च्या सरासरीने १०५२ धावा काढल्या आहेत. यात तीन शतकं आणि चार अर्धशतकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे घरच्या मैदानावरील त्याचे आकडेवारी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही चांगली आहे.
मयंकने भारतात खेळतांना २१५, १०८ आणि २४३ असे तीन जबरदस्त शतकं झळकावली आहेत. त्याने भारतातील एकूण ५ कसोटी सामन्यात ९९.५ अशा प्रचंड सरासरीसह ५९७ धावा काढल्या आहेत. मायदेशात पाच किंवा त्याहून अधिक कसोटी खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये मयंकची सरासरी सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर ब्रॅडमन यांचा क्रमांक असून त्यांनी ऑस्ट्रेलियन भूमीवर ३३ कसोटी सामन्यात ९८.२२ च्या सरासरीने ४,३२२ धावा काढल्या आहेत.
मयंक अगरवालचे मायदेशातील आकडे त्याच्या बाजूने कौल देत असले, तरी फॉर्मात असणाऱ्या खेळाडूंना वगळण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापन घेईल, अशी शक्यता कमी आहे. मात्र संधी मिळाल्यास मयंक आपला मायदेशातील शानदार फॉर्म कायम राखण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या:
आणि पाकिस्तानी क्रिकेटरने मैदानावरच घातला क्विंटन डी कॉकशी वाद, पाहा व्हिडिओ
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत विराट रचणार विक्रमांचा ढीग, भल्याभल्या दिग्गजांवर ठरणार वरचढ