इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 4-0 असा दारुण पराभव पत्करल्यानंतर, भारतीय संघ यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे (ODI) मालिका खेळण्यास सज्ज झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका 14 जुलैपासून सुरू होत आहे.
या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज खेळाडू कर्णधार शुभमन गिलसोबत मैदानात उतरतील. टी20 मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने टीम इंडिया वनडे मालिकेत उतरेल. बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच केली आहे. भारत-इंग्लंड वनडे मालिकेचे वेळापत्रक, संघ आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती खालीलप्रमाणे आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे वेळापत्रक
14 जुलै – पहिली वनडे, एजबॅस्टन – दुपारी 3.30 वाजता
16 जुलै – दुसरी वनडे, कार्डिफ – सायंकाळी 5.30 वाजता
19 जुलै – तिसरी वनडे, लॉर्ड्स – दुपारी 3.30 वाजता
भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा इंग्लंडविरुद्धच्या टी20 संघाचा भाग होता. तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला उर्वरित दोन सामने खेळता आले नाहीत. त्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नसली तरी, खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआय त्याला वनडे संघातून वगळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास, लवकरच त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची घोषणा होण्याची शक्यता आहे.
कर्णधार श्रेयस अय्यर, सूर्यांश शेडगे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, इशान किशन, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग हे खेळाडू नुकत्याच संपलेल्या टी-२० मालिकेतील भारतीय संघाचा भाग होते. या सर्व खेळाडूंना वनडे मालिकेसाठीही भारतीय संघात कायम ठेवण्यात आले आहे.
विराट कोहलीने भारतासाठी शेवटचा वनडे सामना १८ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तो सध्या केवळ वनडे क्रिकेट खेळत असल्याने, त्याला टीम इंडियासाठी खेळण्याच्या तुलनेने कमी संधी मिळतात. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताने अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळली होती; त्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली होती, परंतु आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही. मात्र, आता फिटनेस चाचणी उत्तीर्ण होऊन संघात पुनरागमन केल्यामुळे, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याच्याकडून मोठ्या खेळींची अपेक्षा आहे.






