अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (१२ मार्च) ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पाचही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. तसेच सर्व सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.
ही मालिका टी२० क्रमवारीतील अव्वल २ संघांमध्ये होणार असल्याने मालिका रोमांचक होईल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. तसेच कसोटी मालिकेनंतर टी२० मालिका दोन्ही संघ कसे खेळतात, हे पाहाणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. या टी२० मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व ओएन मॉर्गन करणार आहे, तर भारताचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे.
तसेच या मालिकेत भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना काही विक्रम करण्याची संधी आहे. या विक्रमांबद्दल या लेखातून जाणून घेऊ.
भारत-इंग्लंड टी२० मालिकेत होऊ शकतात हे विक्रम
१. विराट कोहलीने या मालिकेत ७२ धावा करताच तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ३००० धावा करणारा पहिला फलंदाज बनेल. त्याने सध्या ८५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २९२८ धावा केल्या आहेत.
२. विराट कोहलीने या मालिकेत १७ धावा करताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १२ हजार धावा पूर्ण करेल. हा टप्पा पार करणारा तो केवळ तिसरा कर्णधार ठरेल. त्याच्याआधी रिकी पाँटिंग (१५४४०) आणि ग्रॅमी स्मिथ (१४९७८) यांनीच असा कारनामा केला आहे.
३. रोहित शर्माने या मालिकेत २२७ धावा केल्या तर तो देखील आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ३००० धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार करु शकतो. सध्या त्याच्या नावावर १०८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २७७३ धावा आहेत.
४. रोहित शर्माने या मालिकेत २६ धावा करताच तो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण करेल. तसेच विराट कोहलीनंतर (९५००) असा कारनामा करणारा दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरेल. तर जगातील एकूण नववा क्रिकेटपटू ठरेल.
५. रोहित शर्माने या मालिकेत १३ षटकार मारताच तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरेल. सध्या या यादीत मार्टिन गप्टील १३९ षटकारांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर रोहित १२७ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
६. सध्या आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये प्रत्येकी ५९ विकेट्ससह युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. त्यामुळे या मालिकेत बुमराह खेळणार नसल्याने चहलला बुमराहला मागे टाकण्याची संधी आहे.
७. जॉनी बेअरस्टोने ६८ धावा करताच तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १००० धावा पूर्ण करेल. असा कारनामा करणारा तो ५ वा इंग्लंडचा खेळाडू ठरेल.
८. डेविड मलानने या मालिकेत १४५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा क्रिकेटपटू ठरेल. त्याच्या नावावर सध्या १९ आंतरराष्ट्रीय टी२० डावात ८५५ धावा आहेत. तसेच सध्या आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर आहे. आझमने २६ डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या.
९. ओएन मॉर्गनने या मालिकेत १७४ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरु शकतो. सध्या तो या यादीत १२८९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे ऍरॉन फिंच (१४६२) आणि केन विलियम्सन (१३८३) आहेत.
१०. ओएन मॉर्गनने या मालिकेत १२१ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्यास तो ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये ७००० धावांचा टप्पा पार करेल. हा टप्पा पार करणारा तो ल्यूक राईट, ऍलेक्स हेल्स आणि रवी बोपारा नंतरचा चौथा इंग्लंडचा खेळाडू ठरेल. त्याने सध्या ३०७ ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात ६८७९ धावा केल्या आहेत.
११. या मालिकेत खेळण्याची सुर्यकुमार यादवला जर संधी मिळाली तर तो आयपीएलमध्ये १०० सामने खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण कऱणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल. त्याने १०१ आयपीएल सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तर्क असलेले प्रश्न विचारा’, आर अश्विनला टी२० मध्ये खेळवण्याच्या प्रश्नावर भडकला विराट कोहली
शिखर धवनचा पत्ता होणार कट? पहिल्या टी२० साठी ‘या’ सलामीवीरांना मिळणार संधी, विराटचा खुलासा