-अनिल भोईर
दुबई येथे सुरू असलेल्या कबड्डी मास्टर्स या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारत व इराण संघाने सलग दोन विजय मिळवत चांगली सुरुवात केली आहे. कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी इराणने अर्जेन्टिना संघाचा ५४-२४ असा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय मिळवला.
कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दुसरा सामना भारत विरुद्ध केनिया यांच्यात झाला. या सामन्यामध्ये भारतीय संघात बदल करण्यात आले होते. रिशांक देवडिगा, गिरीश इरणक, संदीप नरवाल व मोनू गोयात यांना पहिल्या सातमध्ये स्थान देण्यात आले होते.
भारतीय संघासमोर केनियाचा काही टिकाव लागणार नव्हताच पण सुरुवातीलाच केनियाने भारतीय खेळाडूच्या पकडी करत चांगली सुरवात केली होती. पण सामन्याच्या ८ व्या मिनिटाला केनियावर लोन करत भारताने आघाडी वाढवायला सुरुवात केली. भारताने मध्यंतरापर्यत २७-०९ अशी भक्कम आघाडी घेतली होती. सामन्याचा मध्यंतरा नंतर भारताने आघाडी कायम ठेवत ४८-१९ असा सहज मिळवत स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवला.
रिशांक देवडिगाने यासामन्यात १५ चढाई मध्ये सर्वाधिक १३ गुण मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामध्ये त्याच्या एक सुपररेडचा समावेश होता. कबड्डी मास्टर्स मध्ये भारताकडून सुपरटेन पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरला. रिशांकला मोनू गोयातची चांगली साथ मिळाली, मोनुने पण चढाईत १० गुण मिळवत आपला सुपर टेन पूर्ण केला. तर पकडीमध्ये गिरीश इरणक व संदीप नरवालने चांगला खेळ केला. गिरिशने ४ तर संदीपने ३ गुण मिळवले.
कबड्डी मास्टर्स दुबई २०१८ गुणतालिका:
अ गट
१) भारत – २ सामने – १० गुण
२) पाकिस्तान – १ सामना – ०० गुण
३) केनिया – १ सामना – ०० गुण
ब गट
१) इराण – २ सामने – १० गुण
२) द. कोरिया – १ सामना – ०० गुण
३) अर्जेन्टिना – १ सामना – ०० गुण