भारतीय क्रिकेट संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून मालिकेची सुरुवात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून अखेरीस दोन कसोटी सामने होणार आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.
या दौऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल सात वर्षांनंतर भारतीय संघ परदेशात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळताना दिसणार आहे. आगामी आयसीसी वनडे विश्वचषक 2027 च्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी 2019 मध्येही भारताने न्यूझीलंडविरुद्धच पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. त्या वेळी भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे होते. भारताने त्या मालिकेत दमदार कामगिरी करत 4-1 अशा फरकाने मालिका जिंकली होती.
2019 च्या त्या मालिकेत रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत 200 हून अधिक धावा केल्या होत्या, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ पुरस्कार पटकावला होता.
गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-20 लीग्स आणि आयसीसी स्पर्धांची संख्या वाढल्याने द्विपक्षीय वनडे मालिका बहुतांश वेळा तीन सामन्यांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. त्यामुळे पाच सामन्यांची ही मालिका क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे आयसीसी वनडे विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाला आपल्या ताकदी आणि उणिवा ओळखण्याची तसेच विश्वचषकासाठी सर्वोत्तम संघरचना निश्चित करण्याची मोठी संधी या मालिकेतून मिळणार आहे.
याशिवाय खेळाडूंनाही सातत्यपूर्ण कामगिरी करून विश्वचषक संघातील स्थान मजबूत करण्याची संधी असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा तेव्हापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये कायम राहिल्यास या मालिकेतील सर्वाधिक लक्ष या अनुभवी जोडीकडे असणार आहे.






