‘सर्वात मोठा सामना’. ही सध्या एक अशी गोष्ट झाली आहे, जी सर्वसाधारणपणे वापरली जात असताना दिसते. परंतु यावेळेस तसे नाही. कारण आपण ज्या मोठ्या सामन्याबद्दल बोलतोय, तो 144 वर्षांतील सर्वात मोठा सामना असणार आहे. हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही विज्ञानी पुराव्याची गरज नाही. फक्त असे काही लहान लहान मुद्दे आहेत, जे वाचल्यानंतर तुम्हाला स्वतःला वाटेल की, खरंच हा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना आहे. आम्ही ज्या मोठ्या सामन्याविषयी बोलतोय, तो म्हणजे आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना. जो भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज(18 जून)पासून सुरू होणार आहे. याच संदर्भातील माहिती आज आपण या लेखामधून घेणार आहेत.
1) क्रिकेटचा इतिहास तसा फार वर्षांपूर्वीचा आहे. परंतु दोन देशांमध्ये क्रिकेटचा पहिला अधिकृत सामना 1877-78 मध्ये खेळला गेला होता. हा एक कसोटी सामना होता. जो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये झाला होता. कसोटी क्रिकेटनंतर हळूहळू क्रिकेटमधील स्वरूपात भर पडली. कसोटी सामन्यांबरोबरच एकदिवसीय सामने आणि टी20 सामने खेळले जाऊ लागले. तसे बघायला गेले तर जगामध्ये अनेक भागात टी10 आणि गल्ली-क्रिकेटही खेळले जाते. परंतु त्याला अद्याप आयसीसीची मान्यता प्राप्त झालेली नाही.
2) पहिला एकदिवसीय सामना 1970-71 मध्ये खेळला गेला. याही वेळेस कसोटी सामन्याप्रमाणे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये हा सामना झाला. या सामन्यानंतर चार वर्षांनी एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात झाली. हा पहिलावहिला चषक वेस्ट इंडिजने जिंकला होता. अशाप्रकारे एकदिवसीय क्रिकेटला 1975 मध्ये पहिला विश्वविजेता संघ मिळाला होता.
3) पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना 2004-05 मध्ये खेळला गेला. हा सामना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने खेळला. परंतु यावेळी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध इंग्लंड संघ नसून न्यूझीलंड संघ उभा होता. या पहिल्या सामनानंतर फक्त दोन वर्षांत टी20 विश्वचषक सामन्याची सुरुवात झाली. यामध्ये भारताने पाकिस्तान संघावर विजय मिळवला होता. याचबरोबर 2007 साली क्रिकेटविश्वाला टी20 क्रिकेटचा पहिला विश्वविजेता संघ मिळाला होता.
4) क्रिकेट हा खेळ ऑलम्पिक, कॉमनवेल्थ गेम्सपासून एशियन गेम्सपर्यंत पसरले होते. पॅरिस ऑलिम्पिक (1900) मध्ये ब्रिटनने फ्रान्सला पराभूत करून क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हापासून आतापर्यंत क्रिकेटने पुन्हा कधीच ऑलम्पिकमध्ये सहभाग नोंदवला नाही. मात्र क्रिकेटला ऑलिम्पिक विजेतेचा पुरस्कार मिळालेला आहे. परंतु विश्वविजेताची आणखीनही वाट पाहावी लागणार आहे.
5) यानंतर आयसीसीने क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचा अंतिम सामना 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे. ही 144 वर्षांच्या कसोटी इतिहासामधील पहिली वेळ असणार आहे, जेव्हा क्रिकेटला सर्वात जुन्या (कसोटी) आणि संपूर्ण स्वरूपातील विश्वविजेता मिळणार आहे.
सर्व क्रिकेट चाहत्यांना माहिती आहे की, एकदिवसीय सामन्यांच्या 50 वर्षांच्या इतिहासामध्ये क्रिकेटजगताला 6 वेगवेगळे विश्वविजेते मिळाले आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 16 वर्षांच्या इतिहासात 5 विश्वविजेते मिळाले आहेत. परंतु कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विश्वविजेता मिळणार आहे. यासाठी आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याला क्रिकेटमधील ‘सर्वात मोठा सामना’ म्हटला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार कोहलीची ‘खरी कसोटी’, १४ वर्षांत पहिल्यांदाच भारत धोनीशिवाय खेळणार आयसीसी स्पर्धेची फायनल
‘भारत सर्वश्रेष्ठ संघ, आम्हाला विजयाचा दावेदार म्हणू नका,’ केन विलियम्सनची प्रामाणिक कबुली
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी भारतीय क्रिकेटमध्ये शोककळा, १९४ विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचे निधन