भारतीय संघ त्यांच्या आशिया चषक 2022 मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना रविवारी (28 ऑगस्ट) दुबई येथे खेळला जाणार आहे. या महामुकाबल्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी पुढे आली आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे कोरोना महामारीतून बरे झाले असून युएईत भारतीय संघासोबत जोडले गेले आहेत.
आता पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याविरुद्ध सामन्यावेळी द्रविड (Rahul Dravid) यांच्याबरोबर व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) हेदेखील भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसतील. बीसीसीआयने लक्ष्मण यांना द्रविड (Rahul Dravid) कोरोनातून बरे होईपर्यंत अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते.
झिम्बाब्वे दौऱ्यावर नव्हते गेले द्रविड
द्रविड यांना कोरोनाची लागण होणे ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब होती. आशिया चषकासाठी युएईला उड्डाण भरण्यापूर्वी सपोर्ट स्टाफसह सर्व भारतीय खेळाडूंची नियमित कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये द्रविड यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. त्यामुळे त्यांना भारतातच थांबावे लागले होते. परंतु 3 दिवसांच्या विलगीकरणानंतर पुन्हा एकदा झालेल्या कोरोना चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आढळला आहे. ज्यामुळे त्यांनी त्वरित युएईला उड्डाण भरली असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासोबत जोडले गेले (Rahul Dravid Joins Team India) आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर द्रविड ब्रेकवर होते. केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघासोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मण यांना प्रशिक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. भारताने झिम्बाब्वेविरुद्धची वनडे मालिका 3-0 ने जिंकली होती. त्यानंतर द्रविड कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याने लक्ष्मण यांना काही दिवसांसाठी आशिया चषकासाठी भारतीय संघाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले होते. मात्र आता द्रविड परतल्याने लक्ष्मण यांना हे पद सोडावे लागू शकते.
दरम्यान आशिया चषकातील भारतीय संघाचा पहिला सामना 28 ऑगस्टला दुबईत खेळला जाणार आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्ध रंगेल. त्यानंतर 31 ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध भारतीय संघ दोन हात करेल. हा सामनाही दुबईत होईल. त्यानंतर जर भारतीय संघ अ गटात टॉप-2 मध्ये राहिला तर सुपर-4 मध्येही प्रवेश करू शकतो.