भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची टी२० (IND vs SL T20) मालिका झाली. या मालिकेत भारताने ३-० अशा फरकाने निर्भेळ यश मिळवले. यानंतर या दोन संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना बंगळुरूमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. तो दुसऱ्यांदा भारतात होणार आहे. या सामन्यासाठी ५० टक्के प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोहालीला होणारा पहिला कसोटी सामना विराट कोहलीचा १००वा कसोटी सामना असून तो बंद दाराआड खेळला जाणार आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघाच्या एका अधिकाऱ्याने क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना म्हटले आहे की, ५० टक्के प्रेक्षकांना १२ ते १६ मार्च दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटीच्या पाचही दिवशी सामना पाहण्याची परवानगी दिली जाईल. मोहोलीतील सामन्यासाठी बीसीसीआय प्रेक्षकांना मैदानात येऊन सामना पाहण्याची अनुमती देणार नाही. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ४० हजार आहे. त्यामुळे २० हजार जागा भरता येतील.
कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू केली आहे. मोहाली कसोटीत प्रेक्षकांना परवानगी न देण्यामागे दोन कारणे सांगण्यात आली आहेत; एक म्हणजे मोहाली आणि आसपासच्या भागात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत आणि दुसरे म्हणजे या मालिकेनंतर बहुतेक भारतीय खेळाडूंना बबल ट्रान्सफर अंतर्गत त्यांच्या आयपीएल संघांमध्ये सामील व्हावे लागणार आहे.
पंजाब क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष आर पी सिंगला म्हणाले, “होय, आम्ही बीसीसीआयच्या सूचनेनुसार कसोटी सामन्यादरम्यान काम करणाऱ्यांना सोडून समर्थकांना मैदानात येण्याची परवानगी देत नाहीये. मोहाली आणि शेजारच्या भागामध्ये कोरोनाची प्रकरणे अजूनही वाढत आहेत आणि त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणे चांगले आहे.” तीन वर्षांनंतर मोहालीत आंतरराष्ट्रीय सामना होत असूनही तो पाहायला मिळणार नसल्याने क्रिकेटप्रेमींची निराशा होणार, हे निश्चीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भविष्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचे मोठे पाऊल, युवा खेळाडूंसाठी करणार ‘ही’ महत्त्वाची गोष्ट
चार टी२० सामने, जेव्हा भारतीय यष्टीरक्षक बनले ‘सामनावीर’; पण धोनीचे मात्र नाव नाही