गुरुवारी (२४ फेब्रुवारी) झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघातील पहिल्या टी२० सामन्यात भारताने ६२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर चाहत्यांसोबतच भारतीय खेळाडूंचाही आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र, काही खेळाडूंसाठी हा सामना खूपच खास ठरला. खेळाडूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) होय. मात्र, यावेळी आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून चहलला शुभेच्छा देताना एक मोठी चूक झाली. जी त्यांनी पुन्हा दुरुस्तही केली.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये चहल सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय पुरुष गोलंदाज बनला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात त्याने ३ षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ११ धावा देत १ विकेट घेतली. ही विकेट त्याने श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाची होती. या एका विकेटमुळे त्याच्या नावावर या खास विक्रमाची नोंद झाली. चहलने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना एकूण ६७ विकेट्स घेतल्या आहेत. या विक्रमात चहलने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मागे टाकले आहे. त्याने एकूण ६६ विकेट्स घेतल्या आहेत.
यावेळी राजस्थान रॉयल्स संघाने त्याला शुभेच्छा देणारे एक ट्वीट केले. राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये चहल ‘पुष्पा’ सिनेमातील डायलॉगची ऍक्टिंग करताना दिसत आहे. राजस्थानने या व्हिडिओला कॅप्शन देत “तुम्ही सर्व टी२०त भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पाहत आहात,” असे लिहिले होते.
POV: you’re looking at the leading wicket-taker for India in T20Is 🇮🇳#INDvSL | @yuzi_chahal pic.twitter.com/HoeCcqmuGD
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) February 24, 2022
या पोस्टनंतर राजस्थान रॉयल्सला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी लगेच आपली चूक सुधारत लिहिले की, “पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात आम्ही भावनांमध्ये वाहवत गेलो.”
*Men’s T20Is
The excitement just got to us 🙈 https://t.co/xgH5VpxSTo
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) February 24, 2022
खरं तर, टी२० क्रिकेट प्रकारात सर्वाधिक विकेट्स घेणारी खेळाडू भारतीय महिल संघाची फिरकीपटू पूनम यादव आहे. पूनमच्या नावावर ७२ महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ९८ विकेट्स आहेत. दुसरीकडे चहल पुरुष भारतीय संघाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. यामुळे राजस्थान रॉयल्सने स्वत:ची चूक सुधारली.
राजस्थान रॉयल्सने चूक सुधारल्यानंतर त्यांचे कौतुकही झाले. क्रिकेटच्या विक्रमांबाबत अनेकदा पुरुष खेळाडूंना प्राधान्य दिले जाते, त्यामुळे मोठ्या लीगच्या संघाने याकडे लक्ष देऊन स्वतःची चूक सुधारणे ही एक चांगली गोष्ट होती. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या मेगा लिलावादरम्यान राजस्थान रॉयल्सने चहलला ६.४० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले होते.
महत्वाच्या बातम्या-