राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात आजपासून (4 आॅक्टोबर) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
या मालिकेआधी भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळली आहे. या 5 सामन्यांच्या कसोटीत भारताला 4-1 असा पराभव स्विकारावा लागला आहे. तर विंडिजने बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली आहे. या मालिकेत त्यांनी बांगलादेशला व्हाईटवॉश दिला होता.
त्यामुळे आता भारतीय संघ या मालिकेतून पुन्हा एकदा कसोटीत विजयाची सुरुवात करण्यास आतूर आहे, तर 24 वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्याने विंडिजचा संघ खेळणार आहे.
भारताने विंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी बुधवारी (3 आॅक्टोबर) अंतिम 12 खेळांडूंची नावेही जाहिर केली आहेत. या सामन्यातून भारताचा प्रतिभाशाली युवा फलंदाज पृथ्वी शॉ आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे.
त्याला सलामीवीर म्हणुन संघात स्थान देण्यात आले असुन मयांक अगरवालला पदार्पणासाठी वाट पहावी लागणार आहे.
12 खेळाडूंच्या या संघात विराट कोहली, केएल राहुल, पृथ्वी शाॅ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.
यात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला 12वा खेळाडू म्हणुन स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या 5 कसोटी सामन्यांपैकी शेवटच्या 2 सामन्यांसाठी पृथ्वी शाॅला संघात स्थान देण्यात आले होते परंतू अंतिम 11 खेळाडूंमध्ये मात्र त्याचा सामावेश करण्यात आला नव्हता.
त्यामुळे आता कसोटीत केएल राहुल आणि पृथ्वी शॉ ही नवीन सलामीवीरांची जोडी पहायला मिळणार आहे.
विंडिज संघाला मात्र या सामन्यात वेगवान गोलंदाज केमार रोचची कमी भासणार आहे. रोच त्याच्या आजीचे निधन झाल्याने बार्बाडोसला परतला आहे. त्यामुळे त्याचा या सामन्यात समावेश नसेल. तो हा सामना सुरु असताना पुन्हा संघात सामील होईल. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.
त्याच्या अनुपस्थित विंडिजच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी गॅब्रियल, कर्णधार जेसन होल्डर, किमो पॉल आणि शर्मन लेविसवर असणार आहे.
तसेच देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, किरण पॉवेल आणि गॅब्रियल यांना भारतात खेळण्याचा अनुभव आहे.
राजकोट येथील वातावरण हे उष्ण असणार आहे. तसेच येथील खेळपट्टीही सुरुवातीला फलंदाजांना मदत करणारी असणार आहे.
भारत आणि विंडिज हे दोन संघ आत्तापर्यंत कसोटीत 94 सामने खेळले आहेत. यातील 30 कसोटीत विंडीज विजयी झाले आहेत तर 18 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच 46 सामने अनिर्णित राहिले आहेत.
याबरोबरच भारतात हे दोन संघ 45 वेळा कसोटीत आमने सामने आले असून 11 वेळा भारतीय संघाने बाजी मारली आहे तर 14 वेळा विंडिज संघ विजेता ठरला आहे. त्याचबरोबर 20 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
विंडिजचा संघ याआधी 2013 मध्ये भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी आला होता. या 2 सामन्य़ांच्या मालिकेत भारताने विंडिजला व्हाईटवॉश दिला होता. तसेच ही मालिका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची शेवटची मालिका होती.
भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याबद्दल सर्वकाही-
भारत विरुद्ध विंडिज यांच्यात कधी होणार आहे पहिला कसोटी सामना?
भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 4-8 आॅक्टोबर 2018 दरम्यान होणार आहे.
कोठे होईल भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना?
भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, राजकोट येथे होणार आहे.
किती वाजता सुरु होईल भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना?
भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.
भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना पाहता येणार आहे.
भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?
hotstar.com या वेबसाईटवर भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना ऑनलाइन पाहता येईल.
असा आहे भारताचा 12 जणांचा संघ:
विराट कोहली(कर्णधार), केएल राहुल, पृथ्वी शाॅ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर
यातून निवडला जाईल विंडिजचा 12 जणांचा संघ:
जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरिस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रॅथवेट, रोस्टन चेस, शेन डोवरिच, शॅनन गॅब्रिएल, जहमार हॅमिल्टन, शिमरोन हेटमेयर, शाय होप, अल्झारि जोसेफ, किमो पॉल, कयरान पॉवेल, केमार रोच, जोमेल वॉरिकन.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारत विरुद्ध विंडिज: दुसऱ्या वनडे सामन्याच्या ठिकाणात बदल; आता या शहरात होणार हा सामना
–पृथ्वी शॉसोबत कर्णधार कोहलीने साधला चक्क मराठीत संवाद
–टॉप ५: भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील कसोटी मालिकेत होणार हे खास विक्रम






