कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना (2nd T20I) शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे, तर वेस्ट इंडिजचा प्रयत्न मालिकेत आव्हान कायम राखण्याचा असणार आहे.
भारतीय संघात या खेळाडूंना मिळू शकते संधी
दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सलामीला फलंदाजी करणार हे निश्चित आहे. मात्र, त्याच्याबरोबर सलामीला फलंदाजीसाठी इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड असे दोन पर्याय आहेत. दरम्यान, इशानला पहिल्या टी२० मध्ये संधी मिळाली होती. त्यामुळे त्यालाच दुसऱ्या टी२० सामन्यासाठीही अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळण्याची शक्यता दाट आहे.
त्याचबरोबर मधल्या फळीतही बदल न होण्याचीच शक्यता आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत हे अंतिम ११ जणांच्या संघात मधल्या फळीत कायम असू शकतात. विराटचा फॉर्म चिंतेचा विषय असला, तरी त्याच्या अनुभवामुळे तो संघात कायम असेल. तसेच सूर्यकुमार चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तर रिषभ पंत केएल राहुलच्या अनुपस्थितीत संघाच्या उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळत आहे.
अष्टपैलू म्हणून अंतिम ११ जणांच्या संघात वेंकटेश अय्यरलाच संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच वेंकटेशमुळे संघात समतोल राखला जात असल्याने श्रेयस अय्यरला पहिल्या टी२० प्रमाणेच दुसऱ्या टी२० सामन्यामध्येही संधी न मिळण्याची शक्यता आहे.
गोलंदाजी फळीत पहिल्या टी२० सामन्यात युवा गोलंदाज रवी बिश्नोईने शानदार कामगिरी करत विश्वास संपादन केला होता. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात कायम असेल, तर युजवेंद्र चहल त्याच्या साथीला असू शकतो.
मात्र, वेगवान गोलंदाजांमध्य दीपक चाहरची दुखापत चिंतेचा विषय आहे. त्याला पहिल्या टी२० मध्ये क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला त्याच्या गोलंदाजीचा कोटाही पूर्ण करता आला नव्हता. त्याची दुखापत गंभीर असेल, तर त्याच्याऐवजी दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते. तसेच वेगवान गोलंदाजी फळीत भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि हर्षल पटेल कायम राहण्याची शक्यता दाट आहे.
वेस्ट इंडिज संघात होल्डरच्या पुनरागमनाची शक्यता
भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघासाठी दुसरा टी२० सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून त्यांना मालिकेतील आव्हान कायम ठेवता येणार आहे. दरम्यान, या सामन्यासाठी वेस्ट इंडिज संघात अष्टपैलू जेसन होल्डरचे पुनरागमन होऊ शकते. होल्डर दुखापतीमुळे पहिल्या टी२०मध्ये खेळला नव्हता. या व्यतिरिक्त वेस्ट इंडिज संघात मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे.
दुसऱ्या टी२० सामन्यासाठी संभावित संघ (Predicted XI) –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, मोहम्मद सिराज/दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल.
वेस्ट इंडिज – ब्रेंडन किंग, काईल मेयर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोस्टन चेस, रोवमन पॉवेल, अकील हुसैन, कायरन पोलर्ड (कर्णधार), ओडीयन स्मिथ, जेसन होल्डर, फॅबियन ऍलेन, शेल्डन कॉट्रेल.
महत्त्वाच्या बातम्या –
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत- वेस्ट इंडिज दुसरा टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही
ऋतुराजच्या जागी स्थान मिळालेल्या पवनने साधली संधी! ठोकले पदार्पणात नाबाद दिडशतक
बेंगलोरच्या प्ले-ऑफच्या आशा कायम! एकाच सामन्यात पवनचा सुपर टेन आणि हाय फाईव्ह