कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात (India vs West Indies) सध्या टी२० मालिका (T20I Series) सुरु आहे. कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर होत असलेल्या ३ सामन्यांच्या या टी२० मालिकेतील दुसरा सामना (2nd T20I) शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) होणार आहे. या सामन्यादरम्यान काही विक्रम झालेले पाहायला मिळू शकतात.
हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे, तर वेस्ट इंडिज हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
दरम्यान हा सामना रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने जिंकला, तर हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील १०० वा विजय असेल. सध्या भारताने १५४ टी२० सामने खेळले आहेत. यात ९९ सामने जिंकले आहेत. यातील ९६ सामन्यांचा निकाल निर्धारित षटांकांमध्येच लागला आहे, ३ सामने बरोबरीत सुटल्यानंतर भारताने जिंकले आहेत.
या ३ बरोबरीत सुटलेल्या सामन्यांपैकी एक सामना २००७ सालच्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध झाला होता, जो भारताने बॉल आऊटमध्ये जिंकला. तसेच अन्य दोन सामने न्यूझीलंडविरुद्ध झाले होते, जे भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकले. त्याचबरोबर भारताने ५१ टी२० सामन्यांत पराभव स्विकारला आहे, तर ४ टी२० सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
पोलार्ड करू शकतो अनोखे शतक
केवळ भारतासाठीच नाही तर, वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डसाठी (Kieron Pollard) देखील हा सामना खास ठरू शकतो. तो जर शुक्रवारी खेळला, तर हा सामना पोलार्डचा कारकिर्दीतील १०० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना असणार आहे. तो १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळणारा जगातील नववा आणि वेस्ट इंडिजचा पहिलाच खेळाडू ठरले.
त्याचबरोबर या सामन्यात पोलार्डला आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत १०० षटकार पूर्ण करण्याची संधी असणार आहे. जर पोलार्डने या सामन्यात किमान एक षटकार मारल्यास तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १०० षटकार पूर्ण करेल. तसेच हा पराक्रम करणारा तो आठवा खेळाडू ठरेल.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता चालू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचा युवराज सिंगला झटका, गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली
विराटने दिलेली ‘ती’ खास भेट सचिनने केली होती परत, वाचा भावुक क्षणांचा खास किस्सा