कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात (India vs West Indies) टी२० मालिका सुरू आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या या टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी (२० फेब्रुवारी) होणार आहे. हा सामना वेस्ट इंडिजच्या २०२२ भारत दौऱ्यातील अखेरचा सामना देखील आहे.
मालिकेतील स्थिती
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत २-० अशा विजयी आघाडीवर आहे. त्यामुळे, तिसरा सामन्यातील निकालाने मालिका विजेत्यावर फरक पडणार नाही. मात्र, तिसरा सामना जिंकून भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध निर्भेळ यश मिळवण्याच्या प्रयत्न करेल, तर वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
विराट आणि पंतला विश्रांती
तिसऱ्या टी२० सामन्यापूर्वी बीसीसीआयने विराट कोहली आणि रिषभ पंत यांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे तिसरा सामना भारताला त्यांच्या अनुपस्थिती खेळावा लागणार आहे. दरम्यान, आता तिसऱ्या सामन्यासाठी विराट आणि पंतच्या जागेवर अंतिम ११ जणांमध्ये कोणाला संधी द्यायची हा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनासमोर असणार आहे.
तसेच पंतला विश्रांती दिली असल्याने इशान किशनला यष्टीरक्षणांची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे, त्यामुळे त्याचे अंतिम ११ जणांमधील स्थान जवळपास पक्केच आहे. त्याचबरोबर विराट आणि पंत हे अनुपस्थितीत असल्याने त्यांच्या जागेवर स्थान मिळवण्यासाठी श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड हे प्रबळ दावेदार आहेत. तसेच ऋतुराजला संधी मिळाल्यास तो कर्णधार रोहित शर्माबरोबर सलामीला फलंदाजी करू शकतो. त्याचबरोबर श्रेयस अय्यर जागेवर मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो.
तसेच मधल्या फळीत सूर्यकुमार यादव याला कायम केले जाऊ शकते, तर अष्टपैलू म्हणून वेंकटेश अय्यर कायम राहण्याची दाट शक्यता आहे.
गोलंदाजांच्या फळीत होऊ शकतात बदल
मालिकेत विजयी आघाडी घेतलेली असल्याने भारतीय संघव्यवस्थापन बेंच स्ट्रेंथमधील पर्याय वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे युजवेंद्र चहल ऐवजी तिसऱ्या टी२० सामन्यासाठी अंतिम ११ जणांमध्ये कुलदीप यादवला संधी मिळू शकते. तसेच आवेश खानला दीपक चाहर किंवा भुवनेश्वर कुमार यांच्याऐवजी संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर या मालिकेतून रवी बिश्नोईने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले असल्याने त्याला अंतिम ११ जणांच्या संघात कायम ठेवले जाऊ शकते.
असा असू शकतो भारताचा अंतिम ११ जणांचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या –
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत- वेस्ट इंडिज तिसरा टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने तोडला साहाचा विश्वास, केले मोठे दावे; पण शेवटी कसोटीतून नारळ दिलाच
शाहरुखने रणजीमध्ये केली टी२० स्टाईल धुलाई! इतक्या चेंडूत कुटल्या १९४ धावा