भारत आणि इंग्लंड संघादम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने एकतर्फी सामन्यात भारताचा 227 धावांनी मोठा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघावर सर्व बाजूने टीका होत आहे. मात्र इंग्लंडचा कर्णधार जो रुटने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत पुनरागमन करेल, असे मत मांडले आहे.
सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रुट म्हणाला, “भारतीय खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पूर्ण तयारीसह मैदानात उतरतील. आमच्यासाठी हा एक चांगला विजय आहे परंतु ही केवळ एक सुरुवात आहे. भारत हा एक मजबूत संघ आहे आणि ते जोरदार पुनरागमन करतील. तथापि, आम्ही स्वत:साठी एक उत्तम बेंचमार्क निश्चित केला आहे.”
रूटने जेम्स अँडरसनच्या उत्कृष्ट कामगिरीचे देखील कौतुक केले. रूटने अँडरसनचे इंग्लंडचा सर्वकालिक महान म्हणून वर्णन केले आहे. रुट म्हणाला, “अँडरसन हा युवा खेळाडूंसाठी एक उदाहरण आहे. या वयातही त्याचे कौशल्य व तंदुरुस्ती अविश्वसनीय आहे.”
सामन्यानंतर अँडरसनने देखील पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला “चेंडू रिव्हर्स स्विंग करत होता. आम्हाला माहिती होते की चेंडूचा टप्पा योग्य ठेवावा लागेल व मी ते करण्यास यशस्वी झालो. रिव्हर्स स्विंग आमच्यासाठी फार मोठी बाब ठरली. खेळपट्टी संथ होती त्यामुळे जेव्हा चेंडू हवेत फिरत होता, तेव्हा प्रत्येक वेळी वाटत होते की आम्ही विकेट मिळवू.”
38 वर्षीय अँडरसनने या सामन्यात 63 धावा देत 5 बळी मिळवले. पाचव्या दिवशी रिव्हर्स स्विंगवर त्याने घेतलेल्या विकेट्स निर्णायक ठरल्या. अँडरसनने एकाच षटकात शुभमन गिल व अजिंक्य रहाणेला बाद केले. इंग्लंड संघाला आगामी सामन्यात देखील अँडरसनकडून अशाच प्रकारच्या उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
विजय हजारे ट्रॉफी २०२१ : या दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात, ६ शहरात खेळणार ३८ संघ
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार बदल? हा खेळाडू करू शकतो कसोटी पदार्पण
तुम्ही आमचा कोहिनूर द्या आणि, भारतीय चाहत्याचे मायकेल वॉनला सडेतोड उत्तर