न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक (Women’s Cricket World Cup 2022) स्पर्धेमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. दिग्गज फलंदाज मिताली राज हिच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १०७ धावांनी मोठा पराभव करत आपला पहिला विजय नोंदविला. पुरुष क्रिकेट प्रमाणेच भारतीय महिला संघाने आता वनडे विश्वचषकातील आजवरच्या सर्व ४ सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केले आहे.
भारताची आव्हानात्मक धावसंख्या
माऊंट मॉन्गुई येथे झालेल्या या सामन्यात मितालीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आक्रमक सलामीवीर शफाली वर्मा खातेही न खोलता तिसऱ्या षटकात बाद झाली. मात्र, त्यानंतर अनुभवी स्मृती मंधाना व अष्टपैलू दीप्ती शर्मा यांनी ९२ धावांची भागीदारी केली. दीप्तीने ४० तर स्मृतीने ५२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर मात्र भारतीय डावाला गळती लागली. भारताची अवस्था अचानक ६ बाद ११४ अशी नाजूक या परिस्थितीतून आपला पहिला विश्वचषक खेळत असलेल्या अष्टपैलू स्नेह राणा व पूजा वस्त्राकार यांनी संघाला बाहेर काढले. सातव्या गड्यासाठी १२२ धावांची विश्वविक्रमी भागीदारी त्यांनी केली. दोघींनी वैयक्तिक अर्धशतके साजरी केली. त्यांच्या या खेळाच्या जोरावर भारतीय संघाने २४४ धावा उभारल्या. पाकिस्तान संघासाठी निदा दार व नाशरा संधू यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
भारतीय संघाने दिलेले आव्हान पार करताना पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात यश आले नाही. सलामीवीर सिद्रा अमीनने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. भारतीय महिला गोलंदाजांनी सातत्याने बळी मिळवत पाकिस्तानचा डाव अवघ्या १३७ धावांवर संपुष्टात आणला. भारतासाठी डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक ४ बळी मिळवले. स्नेहा राणा व अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले.
महत्वाच्या बातम्या-
दोन आठवडे दारूच्या थेंबालाही नव्हतं शिवलं; शेन वॉर्नच्या निधनानंतर मॅनेजरचा दावा (mahasports.in)






