एमएस धोनीनंतर आता भारताच्या आणखीन एका कर्णधारावर चित्रपट बनवण्यात येणार आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे करणारी मिताली राजवर आता चित्रपट बनवण्यात येणार आहे.
व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सच्या अहवालानुसार, भारताच्या या कर्णधाराच्या जीवनावर लवकरच एक बायोपिक बनवण्यात येणार आहे. व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्स यांनी या चित्रपटाचे हक्क घेतले आहेत. या आधी यांनी मेरी कोम आणि मिल्खा सिंगसारख्या दिग्गज खेळाडूंवर चित्रपट बनवले आहे.
अलीकडे खेळाडूंच्या आयुष्यवर चित्रपट बनवण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. महेंद्रसिंग धोनी सचिन तेंडुलकर आणि महंमद अझरुद्दीन नंतर आता मिताली राज ही या यादीत सामील होणार आहे. मितालीने स्वतः या बद्दलची पुष्टी केली आहे.
मिताली म्हणते
“व्हयाकॉम 18 मोशन पिक्चर्सबरोबर काम करण्यासाठी मी नक्कीच आनंदी आहे. या चित्रपटामुळे देशातील अनेक मुलींना प्रेरणा मिळेल. याआधीही यांनी क्वीन, मॅरी कोम आणि कहाणी यांसारखे महिलांबद्दलचे अनेक चित्रपट बनवले आहेत. ”
मितालीला अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीने गौरविण्यात आले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६००० पेक्षा जास्त धावा करणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. तिने दोनदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे.