कोलकता। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(1 नोव्हेंबर) पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 110 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने 17.5 षटकात 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. भारताचा प्रभारी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला 6 धावांवर बाद करण्यात विंडीजच्या ओशान थॉमसला यश आले.
त्यानंतर लगेचच शिखर धवन(3), रिषभ पंत(1), केएल राहुल(16) यांनीही स्वस्तात विकेट्स गमावल्या. त्यामुळे भारताची आवस्था 4 बाद 45 धावा अशी झाली होती.
पण त्यानंतर मनिष पांडे आणि दिनेश कार्तिक यांनी भारताचा डाव सांभाळताना संघाला विजयाच्या समीप नेले. मात्र विजय काही धावाच दूर असताना पांडेला(19) खारी पेअरने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले.
पण त्यानंतर कार्तिक आणि या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या कृणाल पंड्याने आणखी विकेट न गमावता भारताला सहज विजय मिळवून दिला. कार्तिकने 34 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. तर पंड्याने 9 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या.
विंडीजकडून ओशान थॉमस(2/21), कर्णधार कार्लोस ब्रेथवेट(2/11) आणि खारी पेअरने(1/16) विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी विंडीजच्या फलंदाजांकडून निराशा पहायला मिळाली. विंडीजकडून या सामन्यात फॅबिएन अॅलेनने सर्वाधिक 27 धावा केल्या. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.
अन्य फलंदाजांपैकी शाय होप(14), शिमरॉन हेटमेयर(10), किरॉन पोलार्ड(14) आणि किमो पॉल (15*) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठण्यात यश आले.
या सामन्यात भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 13 धावांत 3 विकेट्स घेतल्या. अन्य गोलंदाजांपैकी कृणाल पंड्या(1/15), खलील अहमद(1/16), जसप्रीत बुमराह(1/27) आणि उमेश यादव(1/36) यांनी विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर यष्टीमागे दिनेश कार्तिकने तीन विकेट्स घेत महत्त्वाची कामगिरी बजावली.
महत्त्वाच्या बातम्या:
–दिनेश कार्तिकने संगकाराला टाकले मागे; धोनीचाही विक्रम आहे धोक्यात
–‘पंड्या ब्रदर्स’ टी२० मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारी ठरली दुसरीच भावांची जोडी
–‘हिटमॅन’ रोहित शर्माला ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलला मागे टाकण्याची संधी
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर