भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मागच्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. २ वर्षांपूर्वी त्याच्या कंबरेची शस्त्रक्रियाही झाली आहे. त्यानंतर तो सातत्याने त्याच्या फॉर्मशी झगडताना दिसत आहे. तरीदेखील त्याला आगामी टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवडले गेले आहे. तो सध्या यूएईमध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुंबई इंडियन्स संघासोबत आहे.
त्याचा आयपीएलच्या चालू हंगामातील प्रदर्शनही खूप खराब राहीले आहे आणि त्याने अजून एकाही सामन्यात गोलंदाजी केलेली नाही. अशात त्याला टी२० विश्वचषकामधून बाहेर केले जाऊ शकते, आशा बातम्या सामोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता हार्दिकने तो गोलंदाजी करणार असल्याचा खुलासा केला आहे.
पंड्या गोलंदाजी करण्यासाठी करतोय प्रयत्न
शनिवारी (२ ऑक्टोंबर) मुंबई इंडयन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने मुंबईला चार विकेट्स राखून पराभूत केले. या सामन्यात हार्दिक पंड्याला मुंबईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले होते, पण त्याने या सामन्यातही गोलंदाजी केली नाही.
पंड्याने त्याच्या गोलंदाजीविषयी माहिती देताना सांगितले आहे की मी पूर्ण प्रयत्न करत आहे आणि लवकरच गोलंदाजी करताना दिसणार आहे. टी २० विश्वचषकासाठी हार्दिकला भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूच्या रूपात सामील केले गेले असून विश्वचषकापूर्ण त्याने गोलंदाजी करणे गरजेचे आहे. जर त्याने विश्वचषकापूर्वी गोलंदाजी केली नाही, तर त्याला टी २० संघातून बाहेर केले जाऊ शकते.
पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिकचा आत्मविश्वास वाढला
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने मुंबई इंडियन्ससाठी ४० धावांची खेळी केली होती आणि त्यानंतर त्याच्या आत्मविश्वास वाढल्याचे हार्दिकने स्पष्ट केले आहे. तो म्हणाला आहे की, या खेळीने त्याचा आत्मविश्वास वाढवला आहे. दरम्यान, पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चार विकेट्सने राखून विजय मिळवला होता.
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनी हार्दिकविषयी स्पष्ट केली होती भूमिका
यापूर्वी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सांगितले होते की, आम्ही त्याला गोलंदाजी करण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. काही दिवसांमध्ये टी२० विश्वचषक सुरू होणार आहे, तर अशात त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच विश्वचषकासाठी हार्दिकला भारतीय संघात संधी देणारे निवडकर्ते चेतन शर्मा यांनी त्यावेळी सांगितले होते की, हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट आहे आणि गोलंदाजीसाठीही तयार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईविरुद्ध जयस्वाल ‘यशस्वी’! इशान किशनला मागे टाकत ‘या’ विक्रमाच्या यादीत पटकावला अव्वल क्रमांक
शास्त्री गुरुजींकडून धोनीच्या महानतेवर शिक्कामोर्तब; म्हणाले…
कोलकाता वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!






