येत्या जून महिन्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने असतील. इंग्लंड मधील साऊथम्पटनच्या मैदानावर १८ ते २२ जून दरम्यान हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघ या अंतिम सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. मात्र आता या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. ज्यातून भारतीय फलंदाज किवी गोलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. पाहूया नेमकी काय आहे ही आकडेवारी –
भारतीय फलंदाजांना किवी गोलंदाजांचा धोका –
किवी गोलंदाजांच्या फळीत टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर यांचा समावेश आहे. मात्र या गोलंदाजांसमोर भारताच्या प्रमुख फलंदाजांची बॅट नेहमीच थंडावली आहे.
१) अजिंक्य रहाणे – भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला किवी गोलंदाज टीम साउदी पासून धोका आहे. रहाणेची साऊदी विरुद्धची आकडेवारी चिंताजनक आहे. त्याने साऊदी विरुद्ध आत्तापर्यंत ११० चेंडूत केवळ २४ धावा केल्या आहेत आणि यात तो चार वेळा बाद झाला आहे.
२) चेतेश्वर पुजारा – भारताच्या कसोटी फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ असलेला चेतेश्वर पुजारा देखील किवी गोलंदाजांसमोर अपयशी ठरला आहे. पुजाराला साऊदी विरुद्ध १३० चेंडूत फक्त ४३ धावा केल्या आहेत. आणि यादरम्यान त्याने तीन वेळा आपली विकेट गमावली आहे. तर ट्रेंट बोल्टने देखील पुजाराला चार वेळा बाद केले आहे.
३) विराट कोहली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने चांगलेच अडचणीत आणले आहे. वॅगनर विरुद्ध कोहलीची सरासरी अवघी २० असून तो तीन वेळा वॅगनरच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. साऊदी आणि बोल्टने देखील कोहलीला प्रत्येकी तीन वेळा बाद केले आहे. मात्र यांच्या विरुद्ध कोहलीची सरासरी चांगली आहे.
४) मयंक अगरवाल – भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अगरवालला ट्रेंट बोल्टने अनेकदा भेदक गोलंदाजीने त्रास दिला आहे. मयंकने बोल्ट विरूद्ध ५९ चेंडूत ३३ धावा केल्या आहेत. पण या दरम्यान बोल्टने तीन वेळा मयंकला बाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मजबूत जोड! ‘या’ आहेत कसोटी चॅम्पियनशिपमधील भारतीय क्रिकेटपटूंनी केलेल्या सर्वोच्च भागीदाऱ्या
‘हे’ आहे एबीचे पुनरागमन न करण्याचे कारण, वाचून वाटेल अभिमान