क्रिकेटमधील कोणत्याही सामन्यात फलंदाज डावाच्या पहिल्याच चेंडूवर आपली विकेट जाऊ न देणे, यासाठी सर्व कौशल्य पणाला लावत असतो. त्यामुळे सामन्यातील पहिल्याच चेंडूवर विकेट न गमावलेला खेळाडू स्वतःला नक्कीच भाग्यवान समजतो.
संघातील कोणताही खेळाडू डावाच्या सुरुवातीलाच बाद होणे, यापेक्षा खराब सुरुवात दुसरी कोणतीही असू शकत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत असे अनेक खेळाडू आहेत, जे सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होऊन तंबूत परतले आहेत.
एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात आजपर्यंत 73 सामन्यांमध्ये पहिल्याच चेंडूवर खेळाडू बाद झाले आहेत. यापैकी 5 वेळा भारतीय खेळाडू डावाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाले आहेत. याव्यतिरिक्त एकदिवसीय सामन्यांच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होण्याचा विचार केल्यास, तब्बल 60 वेळा खेळाडू बाद झाले आहेत. ज्यातही भारताच्या 4 खेळाडूंचा समावेश आहे.
“वनडे इतिहासात सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा खेळाडू म्हणजे बॅरी वुड, जो इंग्लंड संघातील होता. 1976 मध्ये अँडी रॉबर्टसने त्याला बाद केले होते.”
एकदिवसीय सामन्यात पहिल्याच डावात पहिल्या चेंडूवर सर्वाधिक वेळा बाद होण्याचा विक्रम वेस्ट इंडीज संघाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. आजपर्यंत 6 वेळा ख्रिस गेल सामन्यातील पहिल्याच चेंडूवर बाद झालेला आहे.
गोलंदाजांचा विचार केल्यास श्रीलंका संघाचा जलदगती गोलंदाज चामिंडा वास याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक 5 वेळा प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद करण्याचा विक्रम केला आहे. या व्यतिरिक्त सामन्यातील दुसऱ्या डावात देखील 2 वेळा खेळाडूंना पहिल्याच चेंडूवर बाद केले आहे. भारताकडून दिग्गज गोलंदाज झहिर खान याने 4 वेळा असा पराक्रम करण्याची कामगिरी केलेली आहे.
- सामन्यातील पहिल्याच चेंडूवर बाद झालेले भारतीय फलंदाज :
1. सुनिल गावसकर
1980 मध्ये झालेल्या बेनसन आणि हेजेस जागतिक मालिकेत पाचव्या सामन्यात सुनिल गावसकर पहिल्याच चेंडूवर बाद झाले होते. रिचर्ड हेडली यांनी त्यांची विकेट घेतली होती. पर्थ येथे झालेल्या कमी धावसंख्येच्या या सामन्यात रिचर्ड हेडली (5/32) यांनी दमदार कामगिरी केली होती. तरिही भारताने (162) या सामन्यात न्यूझीलंडला (157) 5 धावांनी हरवले होते.
2. रवी शास्त्री
1985 मध्ये शारजा येथे झालेल्या रॉथमँस चषकात पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर इमरान खान याने भारताच्या सलामी फलंदाज रवी शास्त्री यांची विकेट घेतली होती. इमरान खान (6/14) याने त्या सामन्यात अफलातून कामगिरी केली होती. त्यामुळे भारताचा डाव 125 अडखळला होता. असे असतानाही भारताने पाकिस्तानला 87 धावांवर रोखले आणि हा सामना 38 धावांनी जिंकला.
3. सौरव गांगुली
1997 सालच्या स्वतंत्रता चषकातील चौथ्या सामन्यात चामिंडा वास याने टाकलेल्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर सौरव गांगुलीची विकेट पडली होती. श्रीलंके विरु्दधचा हा सामना मुंबई येथे झाला होता. ज्यात भारतीय संघाने 7 गडी गमावत 225 धावा बनवल्या होत्या. ज्यानंतर सनथ जयसूर्याने केलेल्या नाबाद 151 धावांच्या जोरावर लंकेने हा सामना 41 व्या षटकातच आपल्या खिशात टाकला होता.
4. विरेंद्र सेहवाग
2001 मध्ये कोलंबो येथे कोका-कोला चषकाच्या आठव्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर चामिंडा वासने विरेंद्र सेहवागला आऊट करत तंबूत माघारी धाडले होते. यानंतर भारताने युवराज सिंगच्या नाबाद 98 धावांच्या मदद 227 धावा बनवून श्रीलंकेपुढे 228 चे लक्ष्य दिले होते. त्या उत्तरादाखल लंकेच्या फलंदाजांनी मात्र अक्षरशः नांग्या टाकल्या. श्रीलंकेचा अख्खा संघ 181 धावांवर बाद झाल्याने भारताने हा सामना 46 धावांनी जिंकला होता.
5. सौरव गांगुली
2002 साली झालेल्या नेटवेस्ट मालिकेतील पाचव्या सामन्यात डॅरेन गॉफ याने भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली याला पहिल्याच चेंडूत बाद केले होते. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे झालेल्या सामन्यात भारताची सुरुवात अतिशय खराब झाली होती. मात्र, सचिन तेंडुलकरच्या नाबाद 105 धावांच्या जोरावर भारताने 285 धावा धावफलकावर लावल्या होत्या. मात्र, प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाचा डाव सुरु असताना आणि धावफलक 53 वर 1 बाद असा असतानाच पावसाला सुरुवात झाली आणि हा सामना रद्द करावा लागला होता.
एकदिवसीय सामन्यातील दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर बाद झालेले भारतीय खेळाडू…
1. कृष्णमाचारी श्रीकांत
1986 मध्ये भारताचा संघ इंग्लंड दौऱयावर गेला होता. त्यावेळी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा संघ 162 धावांवर गारद झाला होता. त्यानंतर भारताचा डाव सुरु झाला. त्यावेळी इंग्लंडच्या ग्राहम डिली याने टाकलेल्या डावातील पहिल्याच चेंडूवर सलामी फलंदाज कृष्णमाचारी श्रीकांत याची विकेट गेली होती. परंतु, मोहम्मद अझरुद्दीन यांच्या 83 धावा आणि सुनिल गावसकर यांच्या 65 धावांच्या जोरावर भारताने हा सामना 9 विकेट राखत एकतर्फी खिशात टाकला होता.
2. मनोज प्रभाकर
1994 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला होता. मुंबई येथे झालेल्या त्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडीज संघाने 9 गडी गमावत 192 धावा केल्या होत्या.
यानंतर भारताच्या डावाला सुरुवात झाली. तेव्हा डावातील पहिल्याच चेंडूवर कर्टनी वॉल्श याने भारताचा सलामी फलंदाज मनोज प्रभाकर यांना बाद केले होते. त्यानंतर मात्र नवज्योत सिंह सिद्धू याने नाबाद 65 धावा करुन भारताच्या डावाला आकार दिला. परंतु, पावसाच्या व्यत्ययामुळे 33.1 षटके 4 बाद 135 धावा, अशा धावसंख्या असताना खेळ थांबवावा लागला होता. नियमांच्या अनुसार तेव्हा वेस्ट इंडीजचा संघ आघाडीवर होता.
3. विरेंद्र सेहवाग
2002 साली झालेल्या नेटवेस्ट मालिकेतील सहाव्या सामन्यात श्रीलंका संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 187 धावा बनवल्या होत्या. याच्या उत्तरादाखल भारतीय संघ फलंदाजीला आला. त्यावेळी श्रीलंकेचा गोलंदाज चामिंडा वास याने दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर विरेंद्र सेहवागला बाद केले होते. परंतु, त्यानंतर राहुल द्रविडने 64 धावांची महत्वापूर्ण खेळी करत भारताला विजय प्राप्त करुन दिला होता.
4. सौरव गांगुली
2003 मध्ये भारतीय संघ न्युझीलंड दौऱ्यावर होता. त्यावेळी वेलिंग्टन येथे झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडचा संघ सर्वबाद 168 धावांवर अडखळला होता. त्यानंतर सामन्यातील दुसरा डाव सुरु झाल्यानंतर भारताकडून सलामीला उतरेल्या सौरव गांगुलीला डैरिल टफी याने पहिल्याच चेंडूवर बाद करत तंबूत माघारी धाडले होते. भारतीय संघाचा कर्णधार तेव्हा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने संघातील इतर खेळाडूंवर दडपण आले होते. मात्र, युवराज सिंगच्या 54 धावा आणि झहिर खानच्या 34 धावांच्या जोरावर 8 गडी गमावून भारताने हा सामना 44 व्या षटकातच जिंकला होता.
5. विरेंद्र सेहवाग
भारतात 2003 साली झालेल्या ती संघाच्या एकदिवसीय मालिकेत चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत, 8 गडी गमावून 286 धावा बनवल्या होत्या. यात डेमियन मार्टिन याच्या शतकाचा समावेश होता.
यानंतर भारताच्या डावाला सुरुवात झाली. मात्र, दुर्दैवाने डावाच्या सुरुवातीला पहिल्याच चेंडूवर नाथन ब्रेकनने विरेंद्र सेहवागला बाद केले. या सामन्यात भारताचा संपुर्ण संघ 209 धावांवर गारद झाल्याने ऑस्ट्रेलिया संघाने 77 धावा राखत हा सामना खिशात टाकला होता.