रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. हा महत्त्वाचा सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली. इंग्लंडने या स्पर्धेत विजय मिळवला असला तरी, या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा मान भारतीय संघाला मिळाला.
टी20 क्रिकेटमध्ये चौकार व षटकारांना वेगळे महत्त्व प्राप्त होते. चौकार-षटकार मारणाऱ्या फलंदाजांना देखील या क्रिकेटच्या सर्वात लहान प्रकारात मागणी असते. या विश्वचषकात देखील मोठ्या प्रमाणावर चौकार षटकारांची आतिषबाजी झाली. या संपूर्ण विश्वचषकात सर्वधिक षटकार मारणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावले. विशेष म्हणजे स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा इंग्लंड या यादीत चक्क सातव्या स्थानावर राहिला.
भारतीय संघाने या संपूर्ण विश्वचषकात 37 षटकारांची लयलूट केली. भारतासाठी सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 9 षटकार लगावले. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहली व सलामीवीर केएल राहुल यांनी देखील प्रत्येकी आठ वेळा चेंडू प्रेक्षकांत पाठवला. हार्दिक पंड्या याने सात तर कर्णधार रोहित शर्माने चार चेंडूंवर षटकार ठोकले. तर अक्षर पटेलनेही एक षटकार मारला.
या विश्वचषकात भारतापाठोपाठ श्रीलंकेने सर्वाधिक 30 षटकार ठोकण्याची किमया केली. यजमान ऑस्ट्रेलियाला देखील 28 षटकार मारण्यात यश आले. न्यूझीलंड व पाकिस्तानने प्रत्येकी 25 वेळा चेंडू प्रेक्षकांमध्ये पाठवला. दक्षिण आफ्रिकेने 23 तर विजेत्या इंग्लंडने 22 षटकार लगावले. वैयक्तिक खेळाडूंचा विचार केल्यास झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने सर्वाधिक 11 षटकार मारण्याची कामगिरी केली.
(indian batters hits most sixes in t20 worldd cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला त्याच्याबद्दल आदर नाही’, क्रिस्तियानो रोनाल्डोने मॅनचेस्टर युनायटेडचा बॉस एरिक टेन हॅगला फटकारले
VIDEO: कॅप्टन असावा तर जोस बटलरसारखा! सेलिब्रेशनपूर्वी रशिद, मोईनला केले सतर्क; कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित