प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की भविष्यात त्याला आपल्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळावी. आपल्या राष्ट्रीय संघाची दारे उघडी न झाल्यास अनेकांनी दुसऱ्या देशाकडून नशीब आजमावल्याचीही बरीच उदाहरणे आहेत. मात्र काही क्रिकेटपटू असेही असतात, ज्यांना आपल्या संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी तर मिळते. पण पुढे त्यांचे संघातील स्थान कायम न राहिल्याने ते सातत्याने आत-बाहेर होत असतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ‘भारताचा चायनामन कुलदीप यादव’.
या २६ वर्षीय फिरकीपटूला अपेक्षेप्रमाणे खेळण्याची संधी मिळाली नाही. गतवर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला अवघे ४ वनडे सामने खेळायला मिळाले. उर्वरित टी२० आणि कसोटी मालिकेत तो बाकावर बसून होता. त्यानंतर नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या क्रिकेट मालिकेतही त्याला दुर्लक्षित करण्यात आले. आता कुलदीपने यासंदर्भात मन मोकळे केले आहे.
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कुलदीप म्हणाला की, “मी अशा गोष्टींवर जास्त लक्ष देत नाही. माझ्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे, मी माझ्या सतत माझ्या कौशल्यात सुधारणा करत राहावे आणि शक्य तितकी अचूक गोलंदाजी करावी. जर तुम्ही सातत्याने खेळत असाल, तर फलंदाज तुमच्या शैलीला ओळखून घेतात. जर त्यांना माझा सामना करणे सोपे जात असेल, तर मला माझ्या गोलंदाजीत सुधारणा कराव्या लागणार आहेत. याचमुळे मी माझ्या गोलंदाजी शैलीत कालांतराने बदल करत असतो.”
“फलंदाज ज्याप्रकारे वेगवेगळ्या गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करण्याचा मार्ग शोधतात अगदी गोलंदाजांनी विकेट्स घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधावे लागतात. जर तुमच्यात भरपूर आत्मविश्वास असेल; तर तुम्ही आपोआपच विकेट्स घेण्यास सुरुवात करता. मग मीडिया आणि चाहतेही तुमची कौतुक करु लागतात,” असे त्याने पुढे म्हटले.
“मला जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा स्वत:ला पूर्णपणे तयार ठेवायचे आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने नेहमी मला संधी देण्यामागील आणि न देण्यामागील कारण सांगितले आहे. त्यांचा पाठिंबा मला आहे. त्यामुळे मी अजिबात या गोष्टींची चिंता करत नाही. मी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना सराव सत्रात कठोर मेहनत घेतली. त्या हिशोबाने गरज असताना मला संधीही दिली गेली,” असे शेवटी कुलदीपने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
भावा, पाकिस्तान नाही भारत खेळणार आहे! जेव्हा अख्तरने भज्जीकडे मागितले होते वर्ल्डकप फायनलचे तिकीट