क्रिकेट जगतात दररोज एक नवीन विक्रम बनत असतो. आणि तो मोडतही असतो. पण असे काही विक्रम असतात, जे की फक्त अविश्वसनीय न वाटता ते असण्यावरही विश्वास बसत नाही. पण क्रिकेट इतिहासातील ही घटना आश्चर्यचकित करणारी असून पूर्णपणे ती खरी आहे.
क्रिकेट इतिहासात जेव्हा कोणता गोलंदाज लागोपाठ ३ चेंडूत ३ विकेट्स घेण्याचा कारनामा करतो, तेव्हा त्याला हॅट्रिक म्हटलं जातं. पण ही गोष्ट ही अविश्वसनीय वाटते, की कोणता गोलंदाज २ चेंडूत हॅट्रिक घेऊ शकतो.
हो हे खरं आहे. २ चेंडूत हॅट्रिक करण्याचा विक्रम भारतीय फिरकी गोलंदाज प्रवीण तांबेच्या (Pravin Tambe) नावावर आहे. ज्याने आयपीएल (Indian Premier League) २०१४ मध्ये हा कारनामा केला होता. आणि फक्त २ चेंडूत आपली हॅट्रिक पूर्ण केली होती.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत बर्याचदा हॅट्रिक घेतली गेली आहे. बर्याच गोलंदाजांनी २ आणि काहीनी ३ वेळा हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. परंतु हे सर्व असूनही तांबेची ही हॅट्रिक सर्वात खास आहे. तांबे हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव गोलंदाज आहे, ज्याने २ चेंडूत हॅट्रिक घेतली आहे.
आयपीएलच्या ७ व्या हंगामात एका लीग सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघांमध्ये सामना झाला होता. या सामन्यात राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा केल्या. आणि केकेआरसमोर १७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. केकेआर संघाने शानदार सुरुवात केली आणि अवघ्या १ विकेटच्या मोबदल्यात १२१ धावा केल्या. पण त्यानंतर राजस्थान संघाने २ धावांच्या आत २ विकेट्स घेऊन सामन्यात पुनरागमन केलं.
प्रवीण तांबेने पराभूत झालेला सामना विजयाच्या दिशेनं वळवला
जसं राजस्थानने सामन्यात पुनरागमन केलं. त्यानंतर लगेच १६ व्या षटकाची जबाबदारी तांबेकडे सोपविण्यात आली. या षटकात त्याने ते केलं, जे आजपर्यंत कोणताही भारतीय गोलंदाज करू शकला नाही. त्याने षटकातील पहिला चेंडू वाईड टाकला. पण संजू सॅमसनने (Sanju Samson) त्या चेंडूवर मनीष पांडेला (Manish Pandey) यष्टीचित केलं.
निश्चितच हा त्याचा पहिला चेंडू होता. पण वाईड असल्यामुळे तो धरला गेला नाही. आणि त्याला एक विकेट मिळाली. जेव्हा तो पुन्हा चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा त्याने युसूफ पठाणला (Yusuf Pathan) बाद केले आणि त्याचे एका चेंडूवर २ बळी घेतले.
त्यानंतर त्याने दुसऱ्या चेंडूत रायन टेन डोश्काटेची (Ryan Ten Doeschate) ची विकेट घेऊन क्रिकेट इतिहासात २ चेंडूत ३ विकेट घेण्याचा अविश्वसनीय कारनामा करून दाखवला. त्याच्या या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान संघाने पराभूत झालेल्या सामन्यात पुनरागमन करून विजय मिळविला.
सर्वात जास्त वयात पदार्पण करणारा खेळाडू
विशेष म्हणजे, तांबे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जास्त वयात पदार्पण करणारा भारतीय खेळाडू आहे. एवढंच नाही, तर वयाच्या ४८ व्या वर्षी तो केकेआरच्या संघाकडून आयपीएल २०२०मध्ये पुनरागमन करणार होता. पण बीसीसीआयच्या नियमामुळे तो सामना खेळताना दिसणार नाही. खरं तर त्याने गेल्या वर्षी बीसीसीआयच्या परवानगीशिवाय दुबईतील टी१० लीगमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे तो देशांतर्गत लीगमध्ये भाग घेऊ शकत नाही.
त्याने कारकिर्दीत मुंबईकडून फक्त २ प्रथम श्रेणी आणि ६ अ दर्जाचे सामने खेळले आहेत. तर आयपीएल मध्ये त्याने ३३ सामने खेळून २८ विकेट्स घेतल्या आहेत.