भारतीय क्रिकेट संघाला आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेसाठी संघातील काही खेळाडू आधीच डबलिनमध्ये दाखल झाले आहेत. तर खेळाडूंचा दुसरा गट शुक्रवारी (२४ जून) डबलिनसाठी रवाना झाला. आयर्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार, उपकर्णधार आणि इतर काही महत्वाचे खेळाडू हे दुसऱ्या गटात सहभागी होते, जो शुक्रवारी (२४ जून) डबलिनसाठी रवाना झाला.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघाचा कर्णधार आहे, तर भुवनेश्वर कुमार संघाचा उपकर्णधार आहे. दौऱ्यासाठी जो गट उशीरा रवाना झाला, त्यामध्ये हार्दिक, भुवनेश्वरसह उमरान मलिक (Umran Malik) आणि सूर्यकुमार यादव यांचाही समावेश आहे. एनसीएचे प्रमुख वीवीएल लक्ष्मन (VVS Laxman) देखील दुसऱ्या गटासोबतच आयर्लंडसाठी रवाना झाले, जे टी-२० मालिकेदरम्यान संघाच्या मुख्य प्रसिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत.
दुखापतीनंतर नुकताच संघात परतलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दौऱ्यासाठी उत्सुक दिसत आहे. सूर्यकुमारने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून दोन फोटो शेअर केले आहे. पहिल्या पोटोत तो स्वतः दिसत आहे, जो विमानाच्या आतमधील आहे. त्याच्या चेवऱ्यावर मोठे हास्य आणि आत्मविश्वास देखील पाहिला जाऊ शकतो. त्याच्या पोस्टमधील दुसऱ्या फोटोत वेगवान गोलंदाज आवेश खान, उमरान मलिक, आणि अष्टपैलू वेंकटेश अय्यर दिसत आहेत. या सर्वांना एकत्र येऊन हा ग्रुप फोटो घेतला आहे, त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडूने मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि दौऱ्यासाठी शुभेच्छा येत आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील मालिका संपल्यानंतर खेळाडूंना तीन दिवसांची विश्रांती दिली गेली होती. अशात सर्व खेळाडू शुक्रवारी या दौऱ्यासाठी रवाना होणार होते, पण संघातील काहीजण आधीच आयर्लंडमध्ये दाखल झाले. याठिकाणी पोहोचलेल्या पहिल्या गटात युझवेंद्र चहल आणि ऋतुराज गायकवाड यांचाही समावेश आहे.
आयर्लंडविरुद्धच्या निवडल्या गेलेल्या भारतीय संघा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला मोठ्या काळानंतर संधी मिळाली आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संजूला या दोन टी-२० सामन्यांमध्ये स्वतःची प्रतिभा सिद्ध करावी लागेल. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना २६ जून, तर दुसरा सामना २८ जून रोजी खेळला जाणार आहे. राहुल त्रिपाठीला पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात निवडले गेले आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळू शकला नव्हता, पण आयर्लंड दौऱ्यात त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल.