क्रिकेटचा महाकुंभमेळा असलेल्या टी20 विश्वचषक 2022चे बिगुल वाजले आहे. या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांच्या नजरा फक्त आणि फक्त भारत- पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्याकडे लागले आहे. या सामन्यासाठी 10 मिनिटांच्या आतच जवळपास 90 हजारांहून अधिक तिकीटे विकली गेली आहेत. यावरून समजते की, चाहत्यांमध्ये या सामन्याची किती उत्सुकता आहे. अशात पाकिस्तानविरुद्ध सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने भारतीय संघाची योजना सांगितली आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
‘बीसीसीआय डॉट टीव्ही’वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने म्हटले की, “जर खेळाडू सामन्यादरम्यान स्वत:ला शांत आणि संयम बाळगू शकले, तर आम्हाला तेच निकाल मिळतील, जे आम्हाला हवे आहेत. विश्वचषक जिंकून इतके दिवस झाले आहेत.” भारतीय संघाला मागील विश्वचषक जिंकून आता 11 वर्षे उलटले आहेत. तसेच, रोहितला हे चांगलेच माहितीये की, त्याच्या संघाला विश्वचषक जिंकून देण्यासाठी गोष्टी योग्यप्रकारे कराव्या लागतील. भारतीय संघाने आयसीसीचे शेवटचे विजेतेपद 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जिंकले होते.
‘उपांत्य सामन्याबद्दल विचार करत नाही’
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “आमचे ध्येय आणि विचार प्रक्रिया विश्वचषक जिंकण्याची आहे. मात्र, आम्हाला हेही माहिती आहे की, तिथपर्यंत पोहोचवण्यापर्यंत आम्हाला खूप गोष्टी योग्यरीत्या करण्याची गरज असेल. त्यामुळे आमच्यासाठी एका वेळी एक गोष्ट करणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, प्रत्येक संघावर लक्ष ठेवावे लागेल, ज्यामुळे आम्हाला त्यांच्याशी भिडता येईल. तसेच, आम्ही उपांत्य आणि अंतिम साामन्याबद्दल विचार करत नाही.”
कर्णधार म्हणून पहिली स्पर्धा
कर्णधार म्हणून टी20 विश्वचषक 2022 ही रोहितची पहिलीच आयसीसी स्पर्धा आहे. 12 महिन्यांपूर्वी मागील टी20 विश्वचषकात संघाचे नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) याने केले होते. रोहित म्हणाला, “संघाचे नेतृत्व करणे मोठ्या सन्मानाची बाब आहे. कर्णधार म्हणून हा माझा पहिलाच विश्वचषक आहे. त्यामुळे मी यासाठी खूपच उत्सुक आहे. इथे येऊन काहीतरी खास करण्याची ही शानदार संधी आहे.”
‘ऑस्ट्रेलियात असणार वेगळेच आव्हान’
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “जेव्हाही तुम्ही विश्वचषकासाठी येता, तेव्हा तो अनुभव शानदार असतो. पर्थमध्ये आमचे सराव शिबीर शानदार राहिले. आम्ही भारतात झालेल्या मालिकाही जिंकलो, पण ऑस्ट्रेलियामध्ये आव्हान खूप वेगळे असेल. परिस्थिती आव्हानात्मक असेल, पण आम्हाला इथे लवकर येण्यामागेही एक कारण आहे.”
पाकिस्तानविरुद्धची योजना
भारतीय संघ येत्या 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आपला विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. याविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “सुरुवातीला हा मोठा सामना आहे, पण आम्ही निवांत असू आणि खेळाडू म्हणून आम्हाला काय करण्याची गरज आहे, यावर लक्ष देऊ. आमच्यासाठी हेच महत्त्वाचे असेल.”
आता भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून विजयी सुरुवात करतो की, नाही हे 23 ऑक्टोबर रोजी कळेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता भल्याभल्या गोलंदाज अन् फलंदाजांची होणार पळता भुई थोडी, भारताच्या दिग्गज अष्टपैलूची ट्रेनिंग सुरू
खूप होत आहे टीका, पण सुरेश रैना म्हणतोय, “त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्याच”






