---Advertisement---

‘ऋतुराजसह संघातील इतर युवकांना संधी मिळेल, पण…’, पहिल्या टी२०पूर्वी कर्णधार धवनची प्रतिक्रिया

On: रविवार, जुलै 25, 2021 10:12 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा प्रभारी कर्णधार शिखर धवन त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धची ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका त्याने २-१ ने जिंकली आहे. यानंतर शनिवारपासून (२५ जुलै) धवनच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला टी२० मालिका खेळायची आहे. तत्पुर्वी त्याने युवा खेळाडूंना टी२० मालिकेत संधी देण्याबद्दल वक्तव्य केले आहे.

ऋतुराज गायकवाड, वरुण चक्रवर्ती आणि देवदत्त पडिक्कल यांच्यासारख्या युवा खेळाडूंना टी२० मालिकेत खेळवले जाईल. परंतु आपले प्रथम प्राधान्य मालिका विजयाला असेल, असे धवनने सांगितले आहे.

धवनने पहिल्या टी२० सामन्यापूर्वी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘नक्कीच नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. पण आम्हाला टी२० मालिका जिंकायची आहे. मागच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली होती. कारण आम्ही मागील वनडे मालिका जिंकली होती.’

धवन पुढे म्हणाला की, ‘आता ही एक नवीन मालिका आहे त्यामुळे सर्वोत्तम ११ खेळाडू निवडले जाणार आहेत. आम्ही पहिले दोन सामने जिंकण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आम्ही शेवटच्या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी देणार आहेत. इंडियन प्रीमियर लीगद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे खेळाडू तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांना संधी दिली जाईल.’

‘अर्थातच युवा क्रिकेटपटू तयार आहेत, म्हणूनच ते आज येथे आहेत. एकदिवसीय मालिकेत युवा खेळाडूनी खूपच चांगले प्रदर्शन केले आणि त्याच आत्मविश्वासाने ते टी२० मालिकेत खेळतील अशी आशा आहे. एक संघ म्हणून आम्ही चांगले वातावरण तयार केले आहे आणि एक संघ म्हणून चांगली कामगिरी करण्यास खूप उत्सुक आहोत. फक्त युवा खेळाडूच नाही तर वरिष्ठ खेळाडूही चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहेत,’ असेही तो म्हणाला.

संघातील बदलांबद्दल धवन म्हणाला की, “संघात बदल करायचे का नाही किंवा काय बदल करायचे हे परिस्थितीनुसार ठरविले जाईल. मी म्हटल्याप्रमाणे, जर आम्ही पहिले दोन सामने जिंकले; तर आम्ही कोणत्याही रणनितीनुसार किंवा योजनेनुसार मैदानावर उतरू शकतो. आमचे ध्येय मालिका विजयी होणे हे आहे. त्यामुळे आम्हाला श्रेयस्कर ११ खेळाडूंसह मैदानावर उतरावे लागेल.’

एकदिवसीय मालिकेदरम्यान श्रीलंकेच्या संघाने त्यांच्या प्रदर्शनात बरीच सुधारणा केली असल्याचे धवनचे मत आहे. धवन म्हणाला की, ‘त्यांना याची जाणीव आहे की टी२० विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवण्यासाठी त्यांच्या कामगिरीवर नजर ठेवली जात आहे. त्या दृष्टीने ही मालिका खूप महत्वाची आहे. वैयक्तिकरित्या मी या मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे आणि विश्वचषक स्पर्धेत माझे स्थान निश्चित करायची इच्छा आहे. तर बघुया भविष्यात काय होतंय ते.’

त्याचबरोबर कर्णधार धवन पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव या दोन्ही खेळाडूंचा विचार करूनच संघाची रणनीती आखेल. कारण हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सिक्स मास्टर! असे ४ सलामीवीर, ज्यांनी टी२०च्या पहिल्या षटकात ठोकले भरपूर षटकार

मला श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळण्याची अपेक्षा होती; ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूने व्यक्त केली खंत

हुश्श! टीम इंडियातील ‘त्या’ तिघांचा क्वारंटाईन कालावधी एकदाचा संपला, सराव सत्रात झाले सहभागी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---