fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धोनीच्या रांचीत कर्णधार कोहलीला ‘विराट’ पराक्रम करण्याची सुवर्णसंधी

रांची। उद्यापासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला खास पराक्रम करण्याची संधी आहे.

या सामन्यात जर विराटने 44 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो कसोटी कर्णधार म्हणून 5000 धावांचा टप्पा पार करेल. तसेच हा टप्पा पार करणारा भारताचा पहिला तर जगातील एकूण सहावा कर्णधार ठरेल.

त्याच्याआधी असा पराक्रम ग्रॅमी स्मिथ, ऍलेन बॉर्डर, रिकी पॉटिंग, क्लाइव्ह लॉइड आणि स्टिफन फ्लेमिंग यांना करता आला आहे.

तसेच विराटला कसोटी कर्णधार म्हणून सर्वात जलद 5000 धावा पूर्ण करण्याचीही संधी आहे. हा विक्रम सध्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉटिंगच्या नावावर आहे. पॉटिंगने 97 कसोटी डावात हा टप्पा पार केला होता. तर विराटने आत्तापर्यंत कसोटी कर्णधार म्हणून केवळ 83 डाव खेळले आहेत. त्यामुळे त्याला पॉटिंगचा हा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.

विराटने सध्या कसोटी कर्णधार म्हणून आत्तापर्यंत 50 सामन्यातील 83 डावात 64.36 च्या सरासरीने 4956 धावा केल्या आहेत.

कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू – 

8659 – ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका)

6623 – ऍलेन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)

6542 – रिकी पॉटिंग (ऑस्ट्रेलिया)

5233 – क्लाइव्ह लॉइड (वेस्ट इंडीज)

5156 – स्टिफन फ्लेमिंग (न्यूझीलंड)

4956 – विराट कोहली (भारत)

You might also like