---Advertisement---

रोहित शर्मापूर्वी ‘हे’ भारतीय कर्णधार खेळलेत आयसीसी ट्राफींची फायनल, पाहा संपूर्ण यादी

On: सोमवार, मार्च 13, 2023 10:39 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाने चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवले. भारताने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, तिसऱ्या कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर सोमवारी (दि. 14 मार्च) चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी दोन्ही संघांच्या सहमतीने सामना अनिर्णित ठरला. अशाप्रकारे भारताने ही मालिका 2-1ने खिशात घातली. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत होता. रोहित कर्णधार म्हणून कोणत्याही आयसीसी स्पर्धांचा पहिलाच अंतिम सामना खेळणार आहे. मात्र, तुम्हाला रोहितपूर्वी आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व करणारे कर्णधार माहिती आहेत का? नसेल, तर चला जाणून घेऊयात…

रोहितपूर्वी ‘या’ कर्णधारांनी खेळलाय आयसीसी स्पर्धांचा अंतिम सामना
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यापूर्वी भारताचे असे 4 कर्णधार होऊन गेले, ज्यांनी आयसीसी स्पर्धांचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 3 कर्णधारांनी 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा आयसीसी स्पर्धांचा अंतिम सामना खेळण्याचा मान मिळवलाय. आयसीसी स्पर्धांचा अंतिम सामना खेळण्याचा पहिला मान दिग्गज माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना मिळाला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983साली पहिला वहिला विश्वचषक खेळला होता. या विश्वचषकात भारताने 43 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर भारताला आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी तब्बल 17 वर्षांची वाट पाहावी लागली. भारताने सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्या नेतृत्वाखाली 2000च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला. मात्र, या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 4 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.

त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2002मध्ये गांगुलीच्याच नेतृत्वाखाली भारताने पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारत आणि श्रीलंका संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते. या स्पर्धेनंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2003मध्ये भारताने पुन्हा गांगुलीच्याच नेतृत्वाखाली वनडे विश्वचषकाचा अंतिम खेळला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 125 धावांनी दारुण पराभव केला.

भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला पहिला टी20 विश्वचषक
गांगुलीनंतर आयसीसी स्पर्धांचा अंतिम सामना खेळण्याचा मान एमएस धोनी (MS Dhoni) याला मिळाला. धोनीने 2007 सालच्या पहिल्या-वहिल्या टी20 विश्वचषकाच्या अंंतिम सामन्यात भारताला पोहोचवले. एवढेच नाही, तर भारताने पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत करत आयसीसीची पहिली टी20 ट्रॉफी जिंकली. त्यानंतर भारताने धोनीच्याच नेतृत्वाखाली 2011 सालच्या वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला. या सामन्यातही भारताने 6 विकेट्सने श्रीलंकेला नमवत दुसरा वनडे विश्वचषक जिंकला. हा धोनीच्या नेतृत्वाखालील दुसरा विश्वचषक होता. त्यानंतर भारताने धोनीच्याच नेतृत्वाखाली 2013 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामनाही खेळला. या सामन्यात भारताने इंग्लंडला 5 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. अशाप्रकारे धोनीने भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या. त्यानंतर धोनी भारताला 2014 सालच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही घेऊन गेला. मात्र, श्रीलंकेने भारताला 6 विकेट्सने पराभूत करत विजय मिळवला.

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने खेळले आयसीसी स्पर्धांचे 2 अंतिम सामने
धोनीनंतर भारताला विराट कोहली (Virat Kohli) याच्या रूपात कर्णधार मिळाला. भारताने विराटच्या नेतृत्वाखाली 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात पाकिस्तानने भारताला तब्बल 180 धावांच्या फरकाने पराभूत करत विजय मिळवला. त्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली भारताने 2021 सालच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (World Test Championship Tournament) अंतिम सामना खेळला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 8 विकेट्सने पराभूत करत ट्रॉफी आपल्या नावावर केली.

आयसीसी स्पर्धांचा अंतिम सामना खेळणारे भारतीय कर्णधार
कपिल देप- वनडे विश्वचषक (1983)
सौरव गांगुली- चॅम्पियन्स ट्रॉफी (2000)
सौरव गांगुली- चॅम्पियन्स ट्रॉफी (2002)
सौरव गांगुली- वनडे विश्वचषक (2003)
एमएस धोनी- टी20 विश्वचषक (2007)
एमएस धोनी- वनडे विश्वचषक (2011)
एमएस धोनी- चॅम्पियन्स ट्रॉफी (2013)
एमएस धोनी- टी20 विश्वचषक (2014)
विराट कोहली- चॅम्पियन्स ट्रॉफी (2017)
विराट कोहली- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (2021)
रोहित शर्मा- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (2023)*

भारताला सर्वाधिक वेळा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात नेणारा कर्णधार
4 – एमएस धोनी
3 – सौरव गांगुली
2 – विराट कोहली
1 – कपिल देव
1 – रोहित शर्मा*

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी उस्मान ख्वाजा (180) आणि कॅमरून ग्रीन (114) यांच्या शतकाच्या जोरावर 480 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानेही कडवी झुंज दिली. भारताने विराट कोहली (186) आणि शुबमन गिल (128) यांच्या शतकाच्या जोरावर तब्बल 571 धावा चोपल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पाचव्या दिवशी 2 विकेट्स गमावत 175 धावा केल्या. मात्र, दोन्ही संघांच्या सहमतीने सामना अनिर्णित ठरला.

झाले असे की, श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने 2 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे आता भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. डब्ल्यूटीसी (WTC) स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून रोजी लंडनच्या के ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहित भारताला ही ट्रॉफी जिंकून देतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Indian Captains in ICC Finals)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: अहमदाबादमध्ये दिसली विराटची दिलदारी! सामन्यानंतर केलेल्या ‘त्या’ कृत्याची सोशल मीडियावर चर्चा
मालिकावीर पुरस्काराच्या 2.5 लाखांची अश्विन-जडेजाने केली चुकीची वाटणी? व्हिडिओ जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---