भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असताना इतर संघांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या आयसीसी टी२० विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी स्पर्धेसाठी संघ निवड जाहीर करत आघाडी घेतली. त्याचवेळी भारतीय संघातील बहुतांशी नावे निश्चित असली तरी, एक-दोन जागांची निवड करताना निवड समितीला चांगलीच डोकेदुखी होणार आहे.
काही प्रमुख नावे निश्चित
ओमान व संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या काळात सातवा आयसीसी टी२० विश्वचषक खेळला जाईल. या विश्वचषकासाठी भारतीय संघात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, यष्टीरक्षक रिषभ पंत, अष्टपैलू हार्दिक पंड्या, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांची नावे निश्चित आहेत.
या जागांसाठी करावी लागणार मोठी चर्चा
या प्रमुख खेळाडूंव्यतिरिक्त एका सलामीवीराच्या जागेसाठी युवा पृथ्वी शॉ व अनुभवी शिखर धवन यांच्यात जोरदार रस्सीखेच असेल. भारतीय कर्णधार विराट कोहलीने यापूर्वीच सलामीवीर म्हणून खेळण्याची इच्छा व्यक्त केली असताना, या दोघांपैकी ज्या खेळाडूला संघात स्थान मिळेल, त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळणे काहीसे अवघड होईल. मात्र, या अतिरिक्त सलामीवीराची निवड करताना निवड समितीला चांगली डोकेदुखी होणार आहे.
फिरकीपटूंबाबत बोलायचं झाल्याचा अष्टपैलू रवींद्र जडेजा व युजवेंद्र चहल यांची जागा सध्या सुरक्षित वाटत आहे. तिसरा फिरकीपटू म्हणून चायनामन कुलदीप यादव व युवा राहुल चाहर यापैकी एकाला संधी देण्यात येईल. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावेळी राहुलने दमदार कामगिरी करत विश्वचषकासाठीच्या संघाचा दरवाजा ठोठावला आहे. वॉशिंग्टन सुंदर पूर्णपणे तंदुरुस्त असल्यास त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.
जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या दोन प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या साथीला आणखी कोणत्या दोघांना निवड समिती संधी देते, हे पाहणे रंजक ठरेल. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकूर व दीपक चाहर असे अनेक पर्याय निवड समितीसमोर आहेत.
विश्वचषकासाठी संभावित भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, पृथ्वी शॉ, दीपक चाहर, राहुल चाहर व वॉशिंग्टन सुंदर.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर चोरीचा आरोप, होऊ शकते पोलिस कारवाई
अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी राशिद खान झाला भावुक, देशवासियांना दिला ‘असा’ संदेश





