टी२० विश्वचषकात सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानशी भिडणार आहे. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानने, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले होते. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी संघाला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. भारतीय संघाला मोठ्या फरकाने जिंकणे देखील आवश्यक असेल. जर भारतीय संघ हा सामना हरली तर ते विश्वचषक स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर होतील.
दुसरीकडे अफगाणिस्तान संघ देखील जिंकण्याचा अतोनात प्रयत्न करेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन केले होते. आज आपण भारत- अफगाणिस्तान सामन्यातील पाच महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवू शकते.
१. रोहित शर्माचे सलामीला येणे महत्त्वाचे
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या फलंदाजी क्रमात मोठा बदल केला होता. रोहित शर्माच्या जागी ईशान किशनला सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले होते. या सामन्यात रोहित तिसऱ्या क्रमांकावर आणि कर्णधार विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. या बदलामुळे संघाचे मोठे नुकसान झाले. भारतीय संघाची आघाडीची फळी पूर्णपणे फ्लॉप ठरली. आजच्या सामन्यात भारतीय संघाला ही चूक करायला परवडणार नाही. रोहित एकदा खेळपट्टीवर टिकला तर तो कोणत्याही गोलंदाजाचा फॉर्म खराब करू शकतो. त्यामुळे रोहितचे या सामन्यात चांगला खेळ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
२. अफगाणिस्तानचा फिरकी मारा सांभाळून खेळणे
टी२० विश्वचषकात अफगाणिस्तान संघाची सर्वात मजबूत बाजू म्हणजे त्यांची फिरकी गोलंदाजी. त्यांच्या २० षटकांमध्ये १२ षटके राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान यांची आहेत. हे १२ षटके खेळून काढणे हे भारतीय संघासाठी सर्वात मोठे आव्हान असेल. गेल्या वर्षभरात फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात इश सोधीने भारतीय संघाच्या फलंदाजांना आपल्या फिरकीने त्रस्त केले होते. या सामन्यात भारतीय संघ पुन्हा ती चूक करू इच्छिनार नाही. भारतीय संघात सूर्यकुमार यादव असा एक फलंदाज आहे ज्याने गेल्या एका वर्षात आयपीएल आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजी चांगली खेळली आहे. या एका वर्षात फिरकीविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट १४३ इतका राहिला आहे. आजच्या सामन्यात या खेळाडूला संधी मिळाली तर त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील.
३. पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करणे आवश्यक
भारतीय संघाच्या गोलंदाजांना टी-२० विश्वचषकातील दोन सामन्यांमध्ये केवळ २ विकेट घेता आल्या आहेत. सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांची कामगिरी काही काळापासून अत्यंत खराब राहिली आहे. भारतीय संघाला गेल्या १७ सामन्यांमध्ये फक्त एकदाच पॉवरप्लेमध्ये एकापेक्षा जास्त बळी घेता आले आहेत. जसप्रीत बुमराह वगळता या विश्वचषकात आतापर्यंत कोणताही गोलंदाज आपली छाप सोडू शकलेला नाही. भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांनी तर अद्याप विकेटचे खातेही उघडलेले नाही. अशा स्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांना चांगली कामगिरी दाखवावी लागेल.
४. पहिल्या फळीला चांगली कामगिरी करावी लागेल
टी२० विश्वचषकात भारतीय संघाची पहिली फळी पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने ज्या प्रकारे केएल राहुल आणि रोहितला बाद केले ते कोण विसरू शकेल. न्यूझीलंडविरुद्धही भारतीय संघाची पहिली फळी फार काही करू शकली नाही. विश्वचषकापूर्वी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल दुसऱ्या सामन्यातही पूर्णपणे फ्लॉप ठरला. रोहित शर्माला जीवदान मिळाले, पण त्याला त्याचा फायदा घेता आला नाही.
पाकिस्तानविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावणारा विराट कोहलीही न्यूझीलंडविरुद्ध चांगली खेळी खेळू शकला नाही. रोहित शर्माच्या जागी सलामीवीर म्हणून पाठवण्यात आलेल्या इशान किशननेही निराशा केली. अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात पहिल्या फळीला त्यांचा हरवलेला फॉर्म परत मिळवावा लागणार आहे.
५. मधल्या फळीचे चांगले खेळणे आवश्यक
पहिल्या फळीसोबतच भारतीय संघाची मधली फळीही या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत काही खास कामगिरी करू शकलेली नाही. हार्दिक पांड्याचा फॉर्म आणि फिटनेस ही संघाची सर्वात मोठी समस्या आहे. त्याचवेळी रिषभ पंतने पाकिस्तानविरुद्ध चांगली सुरुवात केली, पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही तर न्यूझीलंडविरुद्ध तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. सूर्यकुमार यादव या सामन्यात मधल्या फळीत पुनरागमन करू शकतो. तो फिरकी चांगला खेळतो. आजच्या करा किंवा मराच्या सामन्यात मधल्या फळीचे खेळणे खूप महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठल्यानंतरही ‘या’ बाबतीत पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम संघावर नाखूष
“शास्त्री आणि व्यवस्थापनाने दोन वर्षांत काहीच केले नाही”; भारतीय दिग्गज भडकला
नव्या टी२० क्रमवारीत बाबरची बादशाहत; हसरंगा गोलंदाजीत ‘नंबर वन’