वनडे विश्वचषक स्पर्धेचा 13वा हंगाम 5 ऑक्टोबरपासून सुरू झाला. पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने होते. न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडला 9 विकेट्सने पराभूत करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मात्र, क्रिकेटप्रेमींना भारतीय संघाचा सामना पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारताचा स्पर्धेतील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतापुढे ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान असणार आहे. चला तर, या सामन्याविषयी महत्त्वाच्या सर्व गोष्टी जाणून घेऊयात…
पाच वेळच्या चॅम्पियनविरुद्ध पहिला सामना
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आपला पहिला सामना 5 वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तत्पूर्वी 1.30 वाजता उभय संघात नाणेफेक होईल.
आमने-सामने आकडेवारी
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषकात झालेल्या सामन्यांची आकडेवारी पाहिली, तर दोन्ही संघ आतापर्यंत 12 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने 8 वेळा विजय मिळवला आहे, तर भारताला 4 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.
दुसरीकडे एकूण आमने-सामने आकडेवारी पाहायची झाली, तर उभय संघ तब्बल 149 वनडे सामन्यांमध्ये आमने-सामने आले आहेत. यातील 56 सामन्यात भारताला विजय मिळवता आले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 83 सामन्यात भारताचा पराभव केला आहे. तसेच, 10 सामने अनिर्णित राहिले होते. दुसरीकडे, भारतीय संघाने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 70 वनडे सामने खेळले आहेत. यातील 32 सामन्यात विजय, तर 33 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तसेच, 5 सामन्यांचा कोणताही निकाल लागला नव्हता.
कुठे पाहता येईल सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील सामन्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. तसेच, सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईलवर डिझ्नी प्लस हॉटस्टार ऍपवर पाहता येईल.
विश्वचषक 2023 साठी उभय संघ
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल.
ऑस्ट्रेलिया-
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, ट्रेविस हेड, ऍश्टन अगर, जोश हेझलवूड, कॅमरून ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा, मिचेल स्टार्क, सीन ऍबॉट. (indian cricket team odi world cup 2023 campaign to start on oct 8 against australia ind vs aus know the head to head records)
हेही वाचा-
‘रचिन मला तुझा अभिमान…’, शतकवीरावर कर्णधार लॅथमने उधळली स्तुतीसुमने, वाचा पूर्ण प्रतिक्रिया
लेक असावा तर असा! वादळी अर्धशतकानंतर सेलिब्रेशन करत तिलकने दाखवला टॅटू; म्हणाला, ‘माझ्या आईसाठी…’