यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनं नुकताच क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर आता अनुभवी फलंदाज शिखर धवनच्या खेळण्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
वास्तविक, शिखर धवनच्या निवृत्तीबाबत सतत चर्चा सुरू होती. कार्तिकच्या निवृत्तीनंतर धवन देखील लवकरच क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र शिखर धवन खरंच क्रिकेटला अलविदा करणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर खुद्द त्यानंच दिलं आहे. शिखर धवन म्हणाला की, कदाचित तो येत्या काही वर्षांत क्रिकेटला अलविदा करेल. याचाच अर्थ तो सध्या निवृत्ती घेण्याच्या विचारात नाही.
शिखर धवन म्हणाला की, “मी बदलाच्या एका टप्प्यातून जात आहे, जिथे माझी क्रिकेट कारकीर्द थांबेल आणि माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होईल. तुमच्याकडे खेळण्यासाठी एक विशिष्ट वयोमर्यादा असते. माझ्यासाठी ते 1 वर्ष, 2 वर्षे किंवा आणखी काही वर्ष असू शकते.” तो पुढे म्हणाला की, दुर्दैवानं मी आयपीएलच्या या हंगामात खूप कमी सामने खेळू शकलो. तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागतो. मी अजूनही तंदुरुस्त होत आहे.
38 वर्षीय शिखर धवन आयपीएलच्या या हंगामात केवळ 5 सामने खेळू शकला. शिखर धवनच्या अनुपस्थितीत सॅम करननं पंजाब किंग्जचं नेतृत्व केलं. शिखर धवन गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय संघाचा भाग नाही. तो टीम इंडियाकडून शेवटचा सामना 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. यानंतर भारतीय संघासाठी रोहित शर्मासोबत शुबमन गिल सलामीवीराची भूमिका निभावत आहे.
याशिवाय धवन गेल्या काही दिवसांपासून दुखापतींशीही झुंज देत आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये देखील त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झालेली नाही. शिखर धवननं भारतासाठी 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6793 धावा ठोकल्या आहेत. तर 68 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावे 1759 धावा आहेत. भारताकडून 34 कसोटी सामने खेळताना धवननं 2315 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुलचं करिअर धोक्यात? भारतीय संघाची काळी बाजू केली उघड…बीसीसीआय ॲक्शन घेणार का?
आयपीएल 2025च्या हंगामात महेंद्र सिंह धोनी चेन्नईकडून खेळताना दिसणार का?
IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबी ‘या’ खेळाडूंना ठेवू शकते संघात कायम…