Team India Schedule :- टी20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका 0-2 अशा फरकाने गमावली. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत भारतीय फलंदाज फिरकीपटूंसमोर संघर्ष करताना दिसले. पहिला वनडे सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारतीय संघाने दुसरा सामना 32 धावांनी गमावला. तर तिसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अतिशय वाईट प्रदर्शन केले आणि 110 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाले. या निराशादायी प्रदर्शनानंतर आता भारतीय संघ मोठ्या विश्रांतीवर जाणार आहे.
भारतीय संघ आता एका महिन्यापेक्षा जास्त काळ मैदानावर दिसणार नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता ऑगस्टमध्ये एकही सामना खेळणार नाही. सप्टेंबरमध्येही पहिल्या 2 आठवड्यात भारताचे सामने होणार नाहीत. बांगलादेशचा संघ सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येईल, जिथे 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल, त्यामुळे ती खूप महत्त्वाची असेल. याचा अर्थ तंदुरुस्त असलेले सर्व खेळाडू या मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवला जाणार आहे. यानंतर या मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे. जो महिनाअखेरपर्यंत चालेल. याचा अर्थ पुढील महिन्यात भारतीय संघ फक्त दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसणार आहे.
ऑक्टोबरमध्ये संघाचे वेळापत्रक खूप व्यस्त असेल
सप्टेंबरनंतर ऑक्टोबरमध्ये टीम इंडियाचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. भारताला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बांगलादेशविरुद्ध टी20 मालिका खेळायची आहे. 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरदरम्यान ही मालिका खेळली जाईल. यानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. उभय संघात 16 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबरदरम्यान 3 सामन्यांची कसोटी मालिका होईल.
मोठी गोष्ट म्हणजे या वर्षी भारत फक्त तीन वनडे सामने खेळला आहे, जे श्रीलंकेत खेळले गेले होते. त्यानंतर वर्षभरात एकही वनडे सामना होणार नाही. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येईल तेव्हाच वनडे सामने होणार आहेत. यानंतर लगेचच चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होईल. म्हणजेच भारताकडे तयारीसाठी फक्त तीन सामने शिल्लक आहेत. या तीन वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यावरून तयारीला वेळ लागेल, असे दिसते. परंतु भारतीय खेळाडू स्वत:ची तयारी कशी करतात? हे पाहणे बाकी आहे.
हेही वाचा –
भारतीय खेळाडू विश्रांतीवर असताना ‘या’ खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली सूर्यकुमार खेळणार देशांतर्गत क्रिकेट
पदक जिंकल्यानंतर मनू भाकरवर पैशांचा वर्षाव, क्रीडामंत्र्यांनी दिला इतक्या रुपयांचा धनादेश
विनेश फोगटवर सरकारने केला चक्क इतका खर्च, आकडा जाणून बसेल धक्का