भारतीय फलंदाज करुण नायर सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. त्यानं स्पर्धेत आतापर्यंत 664 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यानं गेल्या 6 डावांमध्ये 5 शतकं झळकावली. या कामगिरीमुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडू शकतात.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भाकडून खेळणाऱ्या करुण नायरबाबत ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आलंय. वृत्तानसार, भारतीय निवड समिती त्याच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून आहे. अहवालात म्हटलं आहे की, टीम इंडिया सध्या संक्रमणाच्या टप्प्यातून जात आहे. सध्या वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली फॉर्मसाठी झगडत आहेत. त्यामुळे निवड समिती करुण नायरला पुन्हा संधी देण्याच्या विचारात आहे.
33 वर्षीय करुण नायरनं 2016 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकही केलं आहे. परंतु काही खराब खेळींनंतर त्याला 2017 मध्ये संघातून वगळण्यात आलं. तेव्हापासून तो टीम इंडियात कमबॅक करू शकलेला नाही.
बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर असलेल्या करुण नायरनं डिसेंबर 2022 मध्ये एक भावनिक ट्वीट केलं होतं. “प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे.”, असं नायरनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. आता या कष्टाचं चीज होऊन त्याला भारतीय संघात पुन्हा संधी मिळू शकते.
करुण नायरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द – करुण नायरनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी 6 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामने खेळले. त्यानं 7 कसोटी डावांमध्ये 62.33 च्या सरासरीनं 374 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 303 आहे. याशिवाय त्यानं एकदिवसीय सामन्यांच्या 2 डावात 46 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
बुमराह कर्णधार बनला तर उपकर्णधार कोण होणार? हे दोन खेळाडू शर्यतीत
अस्सल मातीतील खेळ! खो-खो विश्वचषकाला आजपासून सुरुवात; कधी आणि कुठे पाहायचा लाईव्ह सामना?
“मी कपिल देवला मारायला निघालो होतो”, माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक खुलासा