भारताकडून क्रिकेट आणि दुसरा एखादा खेळ खेळलेला खेळाडू कोण? असा प्रश्न विचारला तर बहुतेकांच्या तोंडी नाव येते युझवेंद्र चहल. कारण हे सर्वांनाच माहित आहे की, चहलने आपल्या लहानपणी भारतासाठी चेस खेळलेले आहे. याच कारणाने त्याला क्रिकेटच्या मैदानावरही लेग स्पिन ग्रँडमास्टर नावाने ओळखले जाते. मात्र, भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन खेळ खेळणारा तो एकटा क्रिकेटर नाही. त्याच्याआधी दक्षिण भारतातून आलेल्या दोघांनी क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळही भारतासाठी खेळलेला. त्यातील एक होते एम जे गोपालन आणि दुसरे कोटा रामस्वामी. त्याच कोटा रामास्वामी यांची माहिती सांगणारा हा लेख.
कोटा रामास्वामी (Kota Ramaswami) हे नाव अनेक जण पहिल्यांदाच ऐकत असतील. कारण, त्यांचा भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांमध्ये समावेश होत नाही. कारण त्यांचं करिअर अत्यल्प होतं. मात्र, त्यांचा संबंध ज्या कुटुंबाशी येतो ते कुटुंब भारतीय क्रिकेटमधील आदरार्थी कुटुंबापैकी एक आहे. दक्षिण भारतातील क्रिकेटचे जनक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या बुचीबाबू नायडू यांचे ते पुत्र. या कुटुंबातील सर्वच जण क्रिकेटर होते. दक्षिण भारतात आणि प्रामुख्याने तमिळनाडूमध्ये या कुटुंबाचा मोठा सन्मान केला जातो. विशेष म्हणजे, रणजी ट्रॉफीआधी याच बुचीबाबू यांच्या नावाने फर्स्ट क्लास टूर्नामेंट सुरू झाली होती. लोक असा विचार करतात की, ते बुचीबाबू यांचे पुत्र होते तर त्यांचे नाव इतके वेगळे कसे? रामास्वामी यांच्या मामाचे लहानपणीच निधन झाल्यानंतर त्यांच्या आजोबांनी त्यांना दत्तक घेतले. त्यामुळे त्यांचे नावही वेगळे.
वडील इतके मोठे क्रिकेटर म्हटल्यावर क्रिकेट रक्तातच असणे स्वाभाविक होते. याचा प्रत्यय त्यांनी लहानपणी शाळेत असताना दिलेला. वेस्ली हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांनी शेवटच्या विकेटसाठी 200 रन्स करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. 1915 ला इंडियन विरुद्ध युरोपियन या मॅचमधून फर्स्ट क्लास डेब्यू केला. त्यावेळी भारतात नियमित क्रिकेट होत नसल्याने त्यांना जास्त खेळण्याची संधीच मिळाली नाही. 1999 ला शिक्षणासाठी ते केंब्रिज युनिव्हर्सिटीत गेले आणि चार वर्ष तिथे राहिले. केंब्रिजमध्ये त्यांना दुसऱ्या खेळाचे वेड लागले. तो खेळ होता टेनिस. लोक असेही म्हणतात की ते अवघ्या सहा महिन्यात टेनिसमध्ये पारंगत झालेले. युनिव्हर्सिटीमधील सर्वात मानाच्या डोहर्टी कपची मेन सिंगल फायनल त्यांनी 1920मध्ये जिंकली. तिथेच त्यांची ओळख भारताचे त्यावेळचे टेनिसपटू मोहम्मद हादी यांच्याशी झाली. त्यांच्यासोबत त्यांनी नेदरलँडमध्ये डबल्स टूर्नामेंट जिंकली.
दूर इंग्लंडमध्ये नाव कमावत असलेल्या रामस्वामी यांच्या किर्तीचा दरवळ भारतात आला. त्यांना भारताच्या डेव्हिस कप टीममध्ये सामील केले गेले. डबल खेळताना त्यांनी डॉक्टर फिजी यांच्यासोबत आपल्या दोन्ही मॅचेस जिंकल्या. दोन वर्षे ते डेव्हिस कप खेळले. 1922 साली विंबल्डन मेन्स सिंगलचा दुसरा राउंड त्यांनी गाठला. पुढच्या वर्षी विंबल्डनच्या मेन्स डबल्सची फायनल खेळण्याच सौभाग्य त्यांना प्राप्त झालं. इंग्लंडमधील प्रतिष्ठित साऊथ ऑफ इंग्लंड टेनिस चॅम्पियनशिप त्यांनी आपल्या नावे केली. आपल्या अवघ्या चार वर्षाच्या इंग्लंडमधील रहिवासात त्यांनी टेनिसवर अधिराज्य गाजवले.
आपले शिक्षण पूर्ण करून 1923 मध्ये ते भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी कृषी खात्यात नोकरी करण्यास सुरुवात केली. ते प्राध्यापक ही बनले. भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हटल्या जाणाऱ्या एमएस स्वामीनाथन यांचे ते प्रोफेसर. 1936 मध्ये 40 वर्षांचे असताना त्यांना भारतीय क्रिकेट संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी तेव्हाही निराश केले नाही आणि दोन्ही डावात मिळून 100 रन्स केले. पुढे आणखी एक टेस्ट खेळून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला. 1952-1953 मध्ये ते टीम इंडियाचे सिलेक्टर बनले. भारतीय क्रिकेटमधील सर्वात पहिले आत्मचरित्र लिहिण्याचा मानही त्यांचाच. त्यांचे ‘रॅम्बलिंग ऑफ द गेम ऍडिक्ट’ हे आत्मचरित्र त्यावेळी बरेच प्रसिद्ध झालेले.
भारतीय क्रीडाजगतात नाव कमावलेल्या रामस्वामी यांचा शेवट मात्र अत्यंत दुर्दैवी झाला. 15 ऑक्टोबर 1985 रोजी मॉर्निंग वॉकसाठी ते घराबाहेर पडले ते पुन्हा आलेच नाहीत. त्यांची भरपूर शोधाशोध केली गेली. मात्र त्यांचा शोध लागू शकला नाही. विस्डेनने 1990 मध्ये त्यांना मृत मानले. मात्र, भारतीय क्रिकेटच्या सर्वात आदरार्थी कुटुंबातून आलेल्या या अनमोल रत्नाचा अंत अनेकांना चटका लावून जातो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासातील दुर्मिळ योगायोग, भारतीयांनाही लावलाय नंबर; एका क्लिकवर घ्या जाणून
‘त्या’ वर्ल्डकपपासून दक्षिण आफ्रिकेवर लागला चोकर्सचा शिक्का, खेळाडू स्वप्नातही विसरणार नाहीत